लोकसभा निवडणूक निकालानंतर मंत्रिपदासाठी दिल्लीत तळ ठोकून बसलेल्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रादास आठवले यांना देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरा धीर धरण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार होईल, त्यावेळी आठवले यांचा मंत्रिपदासाठी विचार केला जाईल, असे संकेत मोदी यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला त्यांना सोडण्यात आलेल्या सातारा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. परंतु राज्यात भाजप-शिवसेनेच्या विजयात रिपब्लिकन पक्षाचा महत्वाचा वाटा आहे, त्याचा मोबदला म्हणून पक्षाचे नेते रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. स्वत आठवले यांनी अनेकदा तशी भाजप व शिवसेनेच्या नेतृत्वाकडे जाहीर मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच रामदास आठवले दिल्लीला रवाना झाले. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळविण्यासाठी त्यांनी दिल्लीत मोर्चेबांधणी सुरु केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठी-भेटी घेण्याचा सपाटा लावला. राज्यातील भाजप नेत्यांनी आठवले यांना मंत्रिपद मिळण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. परंतु कॅबिनेटऐवजी राज्यमंत्रीपद त्यांना मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.  
दिल्लीत शनिवारी सकाळी रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अविनाश महातेकर, दयानंद मोहिते, मयूर बोरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मोदी यांच्याकडे थेट आठवले यांच्या मंत्रिपदाचा विषय काढला. त्यावर दिल्लीत स्थिरस्थावर व्हायला आपणास अजून थोडा वेळ लागेल, त्यामुळे मंत्रीपदासाठी आताच एवढी घाई करु नका, असा सबुरीचा सल्ला त्यांनी आठवले यांना दिल्याचे समजते.
भाजपसोबतच्या सर्वच मित्र पक्षांना सत्तेत सहभागी करुन घ्यायचे आहे, दीड-दोन महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्यावेळी आठवले यांचा मंत्रिपदासाठी विचार केला जाईल, असे संकेत मोदी यांच्याकडून मिळाल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader