बेइमान, गद्दार अशी विशेषणे लावत शिवसेना नेते रामदास कदम यांनी शनिवारी येथे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर हल्ला चढविला.
जालना विधानसभा मतदारसंघातील शिवसेना मेळाव्यात कदम बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांची उपस्थिती होती. कदम म्हणाले की, शिवसेनेच्या झाडावर फळे चाखायला आलेला नारायण राणे यांच्यासारखा बेईमान पक्षी निघून गेला. निष्ठावंत राहिले, गद्दार गेले. काँग्रेस प्रवेशाच्या वेळी कोकणातील शिवसेना विसर्जनाची भाषा राणे यांनी केली. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. अजित पवार, छगन भुजबळ व राणे यांच्या संपत्तीवरूनही कदम यांनी या वेळी टीका केली.  सीमा भागातील मराठी भाषकांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातही कानडी माणसे राहतात याचे भान ठेवावे, असा इशारा देऊन कदम म्हणाले की, सीमा भागातील मराठी भाषकांच्या पाठीशी शिवसेना आहे. या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरू किंवा वेळ आल्यास कर्नाटकात घुसू. सीमा भागाबद्दल दोन राज्यांत वाद असल्याने हा भाग केंद्रशासित करता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.
‘उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री’
उद्धव ठाकरे हेच भावी मुख्यमंत्री आहेत, असे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मेळाव्यात सांगितले. जालना हा बाळासाहेबांच्या विचारांचा जिल्हा असल्यामुळे आगामी निवडणुकीत सर्व पाचही जागा महायुती जिंकेल असा दावा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam slams narayan rane