कामगारमंत्री भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर मतदारसंघातून अपक्ष लढण्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात राणे राणे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दोघेही जिल्ह्यात जाधव यांच्या विरोधात आहेत. यामुळेच यामागे कोणते राजकीय षडयंत्र आहे, याचीच चर्चा सुरू झाली.
भास्कर जाधव यांच्या विरोधात वेळ आल्यास अपक्ष लढणार
भास्कर जाधव हे राणे यांच्याबरोबरीने शिवसेनेत होते. पुढे जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीचा मार्ग पत्करला. गेल्या नगरपालिका निवडणुकीपासून राणे आणि जाधव यांच्यात वितुष्ट तयार झाले. राणे यांच्या ताब्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि मालवण या तीन नगरपालिकांमध्ये सत्ताबदल झाला आणि राष्ट्रवादीला यश मिळाले. नगरपालिका प्रचाराच्या काळात राणे आणि जाधव यांच्यातील संघर्ष गाजला होता. राष्ट्रवादीच्या राजकारणात तटकरे आणि जाधव या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांमधील वाद जगजाहीर आहे. भास्कर जाधव यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तटकरे यांच्याकडील जलसंपदा खाते जाधव यांना  देण्याचे टाळण्यात आले. तसेच रायगडचे पालकमंत्रीपद जाधव यांना मिळू नये, अशी व्यवस्था तटकरे यांनी केल्याचे सांगण्यात येते. गेल्याच आठवडय़ात रत्नागिरीमध्ये झालेल्या पक्षाच्या निर्धार मेळाव्यालाही भास्कर जाधव यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. राणे आणि तटकरे यांनी एकत्र येऊन जाधव यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू केला तर नाही ना, अशी शंका घेतली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा