केंद्रीय मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर रावसाहेब दानवे, हंसराज अहीर किंवा संजय धोत्रे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. मुंबईतून पीयूष गोयल, किरीट सोमय्या आणि पूनम महाजन यांच्या नावांची शिफारस राज्यातील नेत्यांनी मोदींकडे केली असून कोणाची वर्णी लागेल, हे अजून गुलदस्त्यात आहे.
मोदी यांनी ज्येष्ठ नेत्यांबरोबरच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याशी शनिवारी नवी दिल्लीत चर्चा केली. मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीनिहाय समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी भाजपचे जुने नेते व पालघरचे खासदार चिंतामण वनगा आणि िदडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नावांचा विचार सुरू आहे. त्यांच्यापैकी एकाची निवड होण्याची चिन्हे आहेत.
सर्वच्या सर्व जागा निवडून देणाऱ्या मुंबईतून कोणाला प्रतिनिधित्व द्यायचे, यावर सखोल चर्चा सुरू आहे. गोयल यांचे मोदींशी चांगले संबंध असून ते भाजपचे राष्ट्रीय खजिनदार व जुने नेते आहेत. त्यांच्याबरोबरच ज्येष्ठ या नात्याने विचार केला गेला, तर सोमय्या किंवा तरुण व महिला असल्याने पूनम महाजन यांच्यापैकी एकाची वर्णी मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
रावसाहेब दानवे, हंसराज अहीर की किरीट सोमय्या?
केंद्रीय मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर रावसाहेब दानवे, हंसराज अहीर किंवा संजय धोत्रे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
First published on: 25-05-2014 at 03:51 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravsaheb danve hansraj ahir kirit somaiya