लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती मनसेच्या वर्धापनदिनी येत्या ९ मार्च रोजी राज ठाकरे जाहीर करणार असले तरी जनसुराज्य पार्टीचे विनय कोरे, शेकापचे जयंत पाटील आणि नाशिकचे शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी गुरुवारी कृष्णभुवन येथे राज यांची भेट घेतल्यामुळे तिसऱ्या आघाडीचे नवे समीकरण आकारास येण्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर मनसेच्या वर्धापनदिनी लोकसभेच्या जास्तीतजास्त जागा लढण्याची घोषणा राज करतील, असे मनसेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज यांच्या निवासस्थानी गुरुवारी पार पडली. त्यानंतर दुपारी जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, शेकापचे जयंत पाटील आणि अपूर्व हिरे यांच्यासमवेत तासभर बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व सेना-भाजप महायुती वगळून तिसरी आघडी स्थापन होऊ शकते का, यावर प्राथमिक चर्चा झाल्याचे कोरे यांनी सांगितले. मात्र या बैठकीबाबत मनसेच्या वतीने कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
एकीकडे भाजपचे नेते राज यांच्याशी चर्चा करून कधी महायुतीत येण्याचे आवतण देत आहेत तर कधी लोकसभा न लढण्याचा सल्ला देत आहेत. त्याच वेळी शिवसेनेकडून सातत्याने मनसेला महायुतीत घेण्यास विरोध दर्शविण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा विषय बंद तसेच महायुतीत मनसेला घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशी विधाने करूनही भाजपचे नेते राज यांच्याशी चर्चा करत असल्यामुळे शिवसेना नेतृत्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. गडकरी यांच्यावर टीका करतानाच राज यांच्यावरही सातत्याने सेनेकडून टीका करण्यात येत आहे. मात्र आजपर्यंत राज यांनी आपले पत्ते उघड केले नाहीत की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांच्या टीकेला उत्तर दिलेले नाही. येत्या नऊ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी गडकरी-मुंडे भेट तसेच शिवसेनेच्या टीकेचा जोरदार समाचार राज ठाकरे घेतील, असे मनसेच्या एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले.

Story img Loader