डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळण्यासाठी यशस्वी आंदोलन करुन प्रकाशझोतात आलेल्या आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेना लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार, याकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व विविध रिपब्लिकन गटांचेही लक्ष लागले आहे. आनंदराज यांच्या अध्यक्षतेखाली उद्या शुक्रवारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यात कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, की तटस्थ रहायचे याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
आनंदराज यांच्या नेतृत्वाखाली इंदू मिल जमिनीचे निर्णायक आंदोलन झाले. केंद्र सरकारला त्याची दखल घेऊन इंदू मिलची संपूर्ण जमीन आंबेडकर स्मारकासाठी देण्याचे मान्य करावे लागले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लोकसभा निवडणुकीत पाठिंबा मिळविण्यासाठी आनंदराज यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांनी अजून आपले राजकीय पत्ते खुले केलेले नाहीत.