महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्ष किंवा त्याचे विविध गट या वेळी पाहिल्यांदाच बेदखल ठरावेत इतकी लोकसभा निवडणुकीत रया घालवणारी कामगिरी ठरली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ज्या गटांनी भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी युती केली होती आणि ज्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या होत्या, त्या गटाधिपतींना आंबेडकरी समाजाने धुडकावल्याचे निकालातून जाणवते.
नरेंद्र मोदी लाटेने आच्छादलेल्या या वेळच्या लोकसभा निवडणुकीत मात्र कोणत्याही गटाला खास कामगिरी दाखविता आली नाही, हे त्या-त्या गटाला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून दिसते.
रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षास सातारा ही एकच जागा देण्यात आली होती. या मतदारसंघात रिपाइंच्या उमेदवाराला ७१८०८ मते मिळाली. इतर ४७ मतदारसंघांत रिपाइंची मते महायुतीकडे वळली असली, तरी त्याची मोजदाद कशी करणार हा प्रश्न आहे.
रिपब्लिकन राजकारणातील दुसरे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाचीही मोठी घसरण झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या पक्षाला दहा लाखांपेक्षा जास्त मिळाली होती. या वेळी मात्र साडेतीन लाखाच्या आतच कारभार उरकला आहे. त्यात अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना मिळालेल्या मतांचा मोठा वाटा आहे. आंबेडकर यांना २३८७७६ इतकी मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीपेक्षा दहा हजारांनी त्यांची मते वाढली आहेत, परंतु पक्षाच्या इतर उमेदवारांना खूपच कमी मते मिळाली आहेत.
रा.सू. गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाच्या नावावर अवघी ७६१५६ मते नोंदली आहेत. त्यात अमरावतीतमधून डॉ. राजेंद्र गवई यांना मिळालेल्या ५४ २७८ मतांचा समावेश आहे. रिपब्लिकन खोब्रागडे गट, आंबेडकराईट रिपब्लिकन पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, अशा आणखी आठ-दहा गटांनी निवडणूक लढविली. परंतु त्यांना हजार-पाचशेच्या वर मते मिळालेली नाहीत. लोकसभा निवडणुकीत विविध रिपब्लिकन गटांची अतिशय क्षीण व दयनीय कामगिरी कामगिरी ठरली आहे.
आठवलेंच्या मंत्रिपदासाठी बुद्धाला साकडे
रामदास आठवले यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळावे म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बुद्ध विहारात जाऊन बुद्धाला चक्क साकडे घातले; तर दिल्लीत भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेत आठवले यांनीही मंत्रिपद मिळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र एवढा आटापिटा करूनही अजून काही शुभसंदेश आलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर कर्मकांड नाकारणाऱ्या बुद्धालाच मंत्रिपदासाठी साकडे घातले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आठवले सध्या दिल्लीतच तळ ठोकून आहेत. त्यांनी भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचबरोबर माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. या नेत्यांनी आठवले यांच्या पक्षाला सोडलेल्या सातारा मतदारसंघातील रिपाइंच्या दारुण पराभवाबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन गट बेदखल
महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्ष किंवा त्याचे विविध गट या वेळी पाहिल्यांदाच बेदखल ठरावेत इतकी लोकसभा निवडणुकीत रया घालवणारी कामगिरी ठरली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ज्या गटांनी भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी युती केली होती आणि ज्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या होत्या, त्या गटाधिपतींना …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-05-2014 at 02:37 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republican group ousted from politics of maharashtra