राज्यातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत-साहित्यिक, कार्यकर्ते यांचे लक्ष १६ मेकडे लागले आहे. रामदास आठवले यांचा शिवसेना-भाजपला किती फायदा होतो, प्रकाश आंबेडकर तसेच बहुजन समाज पक्षाची कामगिरी कशी राहणार यावर रिपब्लिकन राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.
रिपब्लिकन पक्षाचे गटा-तटांमध्ये विभाजन झाल्यामुळे या वेळी पहिल्यांदाच आंबेडकरी राजकारण अदखलपात्र ठरले आहे. ‘मान ना मान मै तेरा मेहमान’, म्हणत आठवले यांनी राज्यसभा खासदारकीच्या बदल्यात शंभर टक्के पराभूत होणाऱ्या साताऱ्याच्या जागेवर समाधान मानत शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केली. साताऱ्यातील उमेदवार किती मतांनी हरणार, एवढाच प्रश्न आहे. थोडक्या मतांनी पराभव झाला तर, आठवले यांची प्रतिष्ठा राहील. त्याचबरोबर आठवले यांचा प्रभाव असणाऱ्या मतदारसंघांत युतीच्या उमेदवारांना फायदा किती झाला, याचाही अंदाज निकालानंतर येणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाने २० हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले असले तरी, अकोल्यामधील निकालाकडे लक्ष लागले आहे. आंबेडकर यांच्या जय-पराजयावर त्यांची आणि रिपब्लिकन राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या लहान-मोठय़ा गटांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. मात्र त्याचा कुठेही फारसा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे निकालानंतर या गटांचे तात्कालिक राजकारणीही निकालात निघणार आहे.
मायावती यांच्या बसपने राज्यात सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मागील निवडणुकीत काही मतदारसंघात बसपने काँग्रेस व राष्ट्रवादीला फटका दिला होता.
नेत्यांच्या गटा-तटाच्या राजकारणामुळे आंबेडकरी समाज कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीत या चळवळीतील पक्षांची कामगिरी कशी राहील, यावर रिपब्लिकन राजकारणाची दिशा ठरेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा