समृद्ध समजला जाणारा हा भाग आता शहर आणि ग्रामीण विकासातील वाढती दरी, बेरोजगारी, शीख समाजाला भेडसावणारी असुरक्षितता यांनी काहीसा गांजला आहे. निवडणुक खर्चात सर्वात पिछाडीवर असल्याचे (सरासरी खर्च – प्रति उमेदवार १२.२२ लाख) आकडेवारी दर्शविते.
साक्षरतेचे वाढते प्रमाण, केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याची भावना, राज्य सरकारची दृश्य विकासकामे, आम आदमी पक्षाचा उदय यांचा सामना गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला करावा लागेल.
अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातील शिखांवर झालेले हल्ले, त्यातून जगभरातील शिखांच्या मनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, त्यातच १९८४ मधील सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’साठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ब्रिटनची मदत घेतल्याचा आरोप, त्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलींचा काँग्रेस उपाध्यक्षांनीच उकरून काढलेला मुद्दा आदी बाबी सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. पंजाब हा प्रामुख्याने कृषी समृद्ध भाग. मात्र वाढती महागाई, शेतमालाला न मिळणारे भाव, जलसंधारण, लुधियानामध्ये वाढत्या औद्यागिकीकरणामुळे वाढलेले प्रदूषण, गुरुदासपूरमध्ये वाढणारी बेरोजगारी या मुद्दय़ांवरही काँग्रेसकडे म्हणावे, असे उत्तर नाही. मात्र त्याच वेळी, राज्यात सत्तेत असणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या दोघा मंत्र्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे द्यावे लागलेले राजीनामे, ड्रग्ज घोटाळा, लुधियानामध्येच एसएडीत असलेली अंतर्गत धुसफुस यांचे आव्हान राष्ट्रीय लोकशाहीला पेलावे लागणार आहे.
मतदारांचे कल : पंजाबात शीख, जाट आणि हिंदू यांचे प्राबल्य आहे. २००४ मध्ये रालोआवर लट्टू झालेल्या येथील मतदारांनी २००९ मध्ये मात्र रालोआला आस्मान दाखविले होते. त्यामुळे ‘मतदारांची पक्षीय निष्ठा’ हा मुद्दा पंजाबात फारसा लागू होताना दिसत नाही. त्या मानाने शहरी आणि ग्रामीण अशी मतदारांची विभागणी होऊ शकते. ग्रामीण जनमानसावर शिरोमणी अकाली दलाची मजबूत पकड आहे, तर शहरी भागात ‘नमो प्रभावा’ची भाजपला आस आहे. आम आदमी पक्षाने या निवडणुकीत बॉलीवूड अभिनेत्री गुल पनाग हिला उमेदवारी दिली आहे. त्यातच ‘आयारामां’ना उमेदवारी दिल्यामुळे येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे. त्यामुळे, शहरी भागातील मतदार- विशेषत: नवमतदार कोणाकडे ‘वळतात’ हे पाहणे मनोरंजक ठरणारे आहे.
रंगतदार लढती
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
विजयाची समीकरणे जुळविताना येथे भाजपच्या वाटय़ाला मोजक्याच जागा आल्या आहेत. सलग तीन वेळा राज्यसभेची वारी केल्यानंतर प्रथमच लोकसभेसाठी अरुण जेटली यांना माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याच्या जागी उमेदवारी दिली गेली आहे. अभिनेत्री किरण खेर यांनाही रिंगणात उतरविले गेले आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी :
२००४ च्या तुलनेत २००९ मध्ये घसघशीत यश मिळविणाऱ्या काँग्रेससमोर ते टिकविण्याचे आव्हान आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी (लुधियाना), भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा द्यावे लागलेले माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.