मधुमेहाचा आजार अंगावर वागवत, जेवणा-खाण्याची वेळेची, झोपेची, विश्रांतीची काही तमा नाही. ते पँथरचे फिरणे आजही सुरू आहे. फरक एवढाच, सिद्धार्थ होस्टेलवरून ६३ नंबरची बस धावत-धावत जाऊन पकडायची, शेवटची लोकल चुकली तर स्टेशनातच मुक्काम करायचा, पायपीट करीत होस्टेल गाठायचे. आता दिमतीला आलिशान फार्च्युनर गाडी आहे आणि मागे धावणारे कार्यकर्ते आणि त्यांच्या गाडय़ाही आहेत.
फार्च्युनर गाडीत बसता-बसताच रामदास आठवले यांचा मोबाइल वाजला. ‘हॅलो. जयभीम.. जय महाराष्ट्र, बोला.. हो मी निघालोय, पोहचतोच आहे!’ गाडी अंधेरी-मरोळच्या दिशेने झेपावली. ‘अरे, आपल्या लोकांना सांगा.. सगळीकडे भगवंच दिसतंय, जरा निळेपण दिसू द्या. झेंडे घेऊन या म्हणावं.’ मागे न बघता गाडीत मागे बसलेल्या कार्यकर्त्यांना सूचना. मोबाइल सतत चालू. ड्रायव्हरलाही ‘लेफ्ट घे, राइट घे’ सूचना. रस्त्यांची खडान्-खडा माहिती. मरोळकडे जाताना एका अरुंद रस्त्यावर गाडी आली. पँथरच्या काळात जोश होता, मग्रुरी होती. आता ती राहिली नाही.. त्या जुन्या रस्त्याने, त्यालगतच्या पडक्या िभतींनी, फुटपाथवर खेटून उभ्या असलेल्या झोपडय़ांनी आणि त्यावर तुरळक फडकणाऱ्या निळ्या, पंचशील झेंडय़ांनी बहुधा त्यांना भूतकाळ आठवला असावा.. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपच्या प्रचाराला गेल्या महिनाभरापासून स्वत:ला जुंपून घेतले आहे. महाराष्ट्राभर फिरत आहेत. दलितांची मते मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपच्या उमेदवारांकडूनही प्रचारासाठी तूफान मागणी!
वांद्रे- ‘संविधान’ बंगला. सकाळपासूनच कार्यकर्त्यांची वर्दळ. चहा-नाष्टा करून, कार्यकर्त्यांचा ‘जयभीम’ स्वीकारत आठवले गाडीत बसले. सोबत मयूर बोरकर. त्यांचा जनसंपर्कप्रमुख. वन मॅन आर्मी म्हणून आठवलेंचा सध्या गाजावाजा होतोय. स्वीय साहाय्यक प्रवीण मोरे आज कुठे-कुठे कार्यक्रम आहेत, त्याची माहिती देत असतात. पहिला कार्यक्रम गजानन कीर्तिकर यांचा मरोळ-अंधेरी भागात रोड शो. गाडी पुढे जात असतानाच, एका वाहिनीवरील राज ठाकरे यांच्या हिंदूी मुलाखतीचा विषय आठवलेच काढतात. ‘मी आहे आग, म्हणून राज ठाकरेंचा माझ्यावर आहे राग’ अशा जुळवलेल्या शीघ्र कविताही उच्चरून जातात. मग खळाळून हसणे. ‘आझाद मैदानावरच्या सभेत माझ्यावर टीका केल्यानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी राजचा ठिकठिकाणी पुतळे जाळून निषेध केला. फेसबुकवर काहीतरी वादग्रस्त फोटो, मजकूर फिरू लागल्यानंतर मला राजचा फोन आला. रामदासजी माझी कोणीतरी बदनामी करतंय. त्यांचा आर्जवी तक्रारीचा सूर होता. मी कार्यकर्त्यांना शांत राहायला सांगितले.. तेवढय़ावर पडदा पडला!’
निटी भागात आठवले यांची गाडी आली. आरपीआय, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले. भगवे-निळे झंेडे दिसत होते. कमळाचे दर्शन अभावानेच होत होते. रथावर आठवले व त्यांच्या एका बाजूला कीर्तिकर आणि दुसऱ्या बाजूला सरदार तारासिंग. गौतम नगर, जयभीम नगर, बेस्ट नगर, मिलिंद नगर या दलित वस्त्यांमधून रोड शो सुरू झाला. हातात माइक. भाषण, म्हणजे कवितांची आतषबाजी.. ‘आता गायब होणार आहे काँग्रेसची खादी आणि देशाचे पंतप्रधान होणार आहेत नरेंद्र मोदी’.. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला अडवा.. आणि महायुतीला निवडून देऊन इतिहास घडवा’.. टाळ्या, शिटय़ा, घोषणा..
फुटपाथवरच साहेबांबरोबर फोटो काढण्यासाठी चढाओढ सुरू झाली. चहाची आठवण झाली. जवळ रेसिडेन्सी हॉटेल आहे, तिकडे चला, त्यांचीच कार्यकर्त्यांना सूचना. ‘झेंडे जरा मोठे लावा आणि त्यावर कंसात ‘ए’ लिहायला विसरू नका’.. कार्यकर्त्यांना आदेश. के. एल. बजाज यांचा अंत्यविधी कुठे आणि किती वाजता आहे. प्रचाराच्या रणधुमाळीतही जुन्या मित्राची आठवण. रेसिडेन्सी हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत चाळीस-पन्नास कार्यकर्त्यांचा ताफाच आत घुसला. सोबत सेनेचे रमेश लटके, सुनील चाळके होते. आरपीआयचे काका खंबाळकरही तिथे पोचले. हॉटेलमध्येही पंधरा-वीस मिनिटे कार्यकर्त्यांबरोबर फोटोसेशन झाले.
अंधेरीवरून वरळीकडे कूच. दुपारी एकच्या दरम्यान वरळीत जनशक्ती-मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात दाखल. बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. डाव्या पक्षातील जुने नेते-कार्यकर्ते भेटले. मग तासभर तिथे राजकारणावर गप्पा. रिपाइं नेते अर्जुन डांगळे पुढच्या प्रवासात सहभागी झाले. गाडीतच फोन आला. ‘हॅलो.. थोरवेजी आमचे कार्यकर्ते प्रकाश तपासे तुमच्याकडे येतील. भीमोत्सवासाठी त्यांना मदत करा’.. दुपारी अडीच-पावणे तीन वाजता पुन्हा वांद्रे, संविधान बंगला. जेवण, विश्रांतीनंतर पुन्हा प्रचारासाठी ऐरोलीच्या दिशेने कूच. मध्येच परळच्या दामोदर हॉलमधील मुंबई मुन्सिपल को-ऑपरेटिव्ह कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाची आठवण झाली. परळच्या दिशेने गाडी निघाली. दामोदर हॉलमध्ये आठवलेंचे हार-तुरे-घोषणांनी स्वागत. छोटे भाषण. ‘मला पुढे प्रचाराला जायचे आहे, त्यामुळे संध्याकाळी घोळात-घोळ नाटक बघता येणार नाही, परंतु मतदानात घोळ घालू नका’, असा सल्ला. हशा, टाळ्या.  
सांयकाळी पाच वाजता ऐरोली पुलावरचा टोलनाका ओलंडला. दोन-अडीचशे मोटारसायकलींवर निळे झेंडे लावून तरुण कार्यकर्त्यांची फौज आठवलेंच्या स्वागताला उभी होती. उघडय़ा जीपवर आठवले. ऐरोली सेक्टर एक ते चार असा तासभर रोडशो झाला. सहा वाजता सभा. आठवलेंवर एका कार्यकर्त्यां कवीने पहाडी आवाजात गीत सादर केले.. कोकण-विदर्भ-मराठवाडय़ात वादळ उठवले, एकच नेता पुरून उरला रामदास आठवले. .. आठवलेंमधला कवी जागा होताच. भाषणाला सुरुवात. ‘मी साऱ्या महाराष्ट्रात फिरलो, या काँग्रेस-राष्ट्रवादीला पुरून उरलो. मी गावागावात फिरलो, म्हणून महायुतीचा शिल्पकार ठरलो. शरद पवार म्हणतात, अध्र्या चड्डीवाल्यांकडे सत्ता देणार का, परंतु भाजपमध्ये काही अर्धे चड्डीवाले असले तरी आम्ही फुल चड्डीवाले आहोत..’ ..हशा, टाळ्या, शिटय़ा. ‘१६ मेनंतर दिल्लीत ११ वाजून ११ मिनिटांनी नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी होणार आहे, त्यानंतर ११ वाजून १५ मिनिटांनी मंत्री म्हणून माझा शपथविधी होणार आहे. मोदी पंतप्रधान झाले तर मी मंत्री होणार आहे आणि मला मंत्री करणार असतील तर मोदी पंतप्रधान होणार आहेत’.. असे आणखी चौकार-षटकार..
भिवंडी मतदारसंघातील कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी ताफ्यासह मोहनेकडे प्रवास सुरू. शिळ फाटय़ावर कोकण रत्न हॉटेलवर शंभर-दीडशे कार्यकर्ते वाट बघत होते. प्रल्हाद जाधव व इतर कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणी ऐकवायला सुरुवात केली. सेना-भाजपवाले मान-सन्मान देत नाहीत. आतापर्यंत आम्ही एकही पैसा त्यांच्याकडून घेतला नाही. तर आठवले म्हणाले, तुम्ही घेत नाही तर मला आणून द्या, म्हणजे पक्षाला आणून द्या. गंभीर वातावरण एकदम हलकेफुलके झाले.. रात्री साडेआठच्या सुमारास मोहने गाठले. आरपीआयचे-सेना-भाजपचे कार्यकर्ते स्वागताला जमले होते. उल्हासनगरला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेला हजर राहायचे होते. त्यांचे सतत फोन येत होते. अखेर धावपळ करीत पावणेदहा वाजता सभास्थानी आठवले पोहोचले. माइक ताब्यात घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकायण सुरूझाले. अजून पाच मिनिटे होती. ‘घ्या तुम्ही बाबासाहेब-शिवाजींची आण, निवडून आणा धनुष्य बाण.’ शेवटची पाच मिनिटे अशी कारणी लावून, कार्यकर्त्यांचा गराडा कसाबसा पार करत.. मुंबईच्या दिशेने कूच. रात्री साडेबारा-एक वाजता. संविधान बंगल्यावर आगमन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा