महायुतीने विदर्भात लोकसभेसाठी एकही मतदारसंघ न दिल्याने रिपाइं (आ) कार्यकर्ते संतप्त झाले असून महायुतीच्या एकाही उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांची नाराजी अखेपर्यंत कायम राहिल्यास विदर्भात महायुतीला जबर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महायुतीत सहभागी होण्यापूर्वी रामदास आठवले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली तेव्हा महायुतीत सामील होण्याच्या बाजूने सर्वप्रथम विदर्भातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कौल दिला होता आणि त्यासंबंधी आग्रह धरला होता. विदर्भातील कार्यकर्त्यांच्या या भरवशावर आठवले यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय निश्चित केला. महायुतीत सहभागी झाल्यानंतर महायुतीच्या प्रत्येक कार्यक्रमात, तसेच विविध नेत्यांच्या दौऱ्यात बहुसंख्येने हजेरी लावली होती. उमेदवारी वाटपात रिपाइंने विदर्भात रामटेक किंवा वर्धा किंवा विदर्भात किमान एक लोकसभा मतदार संघाची मागणी केली होती. केवळ मागणी करूनच हे कार्यकर्ते थांबले नाहीत तर त्यांनी बूथ पातळीपासून कार्यकर्त्यांची मजबूत संघटन बांधणी केली होती. महायुतीने रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठविले. लोकसभेसाठी महायुतीने राज्यात केवळ सातारा ही एकमेव जागा रिपाइंला दिली. विदर्भात रामटेक सोडाच, एकही जागा न दिल्याने रिपाइं कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
 रविवारी नागपुरात रिपाइंच्या विदर्भातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष भीमराव बनसोड, विदर्भ संघटक राजन वाघमारे, अ‍ॅड. केशव धाबर्डे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष बैठकीत हजर होते. विदर्भात महायुतीने एकही जागा रिपाइंसाठी न सोडल्याने त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अद्यापही उशीर झालेला नाही. विदर्भात केवळ एकच म्हणजे वर्धा मतदारसंघ रिपाइंसाठी सोडावा, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. असे न झाल्यास विदर्भात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला असून तो पक्षाध्यक्ष रामदास आठवले व महायुतीच्या नेत्यांना कळविला आहे.
दरम्यान, रिपाइंच्या या निर्णयाने महायुतीच्या नेत्यांची प्रतिक्रिया कळलेली नाही. विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघात दलित मतांची संख्या निर्णायक आहे. विदर्भातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात तीन ते चार लाख निर्णायक दलित मते आहेत. याआधी प्रकाश आंबेडकर, रा.सू. गवई, जोगेंद्र कवाडे आदी अनेक रिपाइंचे उमेदवार लोकसभेत निवडून गेले, तसेच दलित मतांच्या भरवशावर कांँग्रेस वा राष्ट्रवादीचेही उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे दलित मतांचा महायुतीलाही फायदा होऊ शकतो. तरीही महायुतीने याकडे दुर्लक्ष केले असल्याची भावना रिपाइंचे विदर्भ प्रदेश संघटक राजन वाघमारे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अमरावतीमध्येही रिपाइंचे (ग) अ‍ॅड. राजेंद्र गवई उमेदवारी न मिळाल्याने आघाडीविरुद्ध संतप्त झाले असून त्यांची व आठवले गटाची नाराजी दूर होऊ न शकल्यास त्याचा जबर फटका आघाडी व महायुतीला बसू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा