भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या दौऱ्यात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. अमरावतीच्या जाहीर सभेत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याने शिवसैनिकांना तेवढाच दिलासा मिळाला. कारण मुंबईतील जाहीर सभेत मोदी यांनी शिवसेना किंवा शिवसेनाप्रमुखांचे नाव घेण्याचे टाळले होते. नांदेडच्या जाहीर सभेत मोदी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले. ‘आदर्श’ घोटाळ्यात त्यांना सोडणार नाही, असा दमच भरला. नांदेडमध्ये ‘आदर्श’चा उल्ल्लेख करून अशोक चव्हाण यांची डोकेदुखी वाढविली. हे करताना त्यांनी राजकारणाच्या शुद्धीकरणावर भर देताना राजकीय खटले वर्षभरात निकालात काढण्याची घोषणा केली. मोदी यांच्या या आश्वासनाने भ्रष्टाचाराची तिडीक असणारे मतदार साहजिकच सुखावले असणार. मोदी यांनी ही घोषणा केली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच राजकीय नेत्यांच्या विरोधातील खटले वर्षभरात निकालात काढावे, असा आदेश दिला आहे. म्हणजेच मोदी बोलले त्यात नवीन असे काहीच नाही. राजकरणाचे शुध्दीकरण मोदी यांना खरोखरीच करायचे असल्यास त्यांच्या पक्षापासूनच करावी लागेल. अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करणाऱ्या मोदी यांनी कर्नाटकातील येडियुरप्पा किंवा श्रीरामालू यांच्याबाबत सोयीस्कर मौन बाळगले. अशोक चव्हाण यांना सोडणार नाही, अशी भाषा मोदी यांनी केली पण त्याच ‘आदर्श’ इमारतीत भाजपचेच राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांच्या नऊ बेनामी सदनिका असल्याचा आरोप होत आहे. भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या येडियुरप्पा यांना भाजपमध्ये फेरप्रवेश देण्यास पक्षातील नेत्यांचा विरोध होता. पण मोदी यांच्यामुळेच येडियुरप्पा यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आणि त्यांना आता शिमोगा मतदारसंघातून उमेदवारीही मिळाली आहे. बिहारमध्ये वादग्रस्त पाश्र्वभूमी असलेल्या शबीर अली यांना पक्षात प्रवेश देण्यात आला पण नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर त्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला. राजकारणाच्या शुद्धीकरणाचा मोदी उल्लेख करीत असले तरी येडियुरप्पा यांच्यासारख्या नेत्यांना पाठीशी घालण्याच्या त्यांच्या कृतीची चर्चा ही होणारच. वास्तविक येडियुरप्पा यांना भाजपने उमेदवारी दिल्यानेच अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला होता. भाजप काय किंवा काँग्रेस सारेच एकाच माळेचे मणी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा