हत्ती भांडतात तेव्हा गवत चिरडले जाते, अशी एक आफ्रिकी म्हण आहे. मुंबईत गुरुवारी झालेल्या राड्यानंतर या म्हणीचा पडताळा किमान या दोन सेनेच्या मागे फरफटत जाणाऱ्या कार्यकर्ते व मतदारांना आला असेल.
खरं तर अफलातून खेळी करत उमेदवार देण्याची घोषणा करणाऱया राज ठाकरे यांच्याकडून चांगल्या व वेगळ्या प्रचाराची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी पूर्ण भ्रमनिरास केला.
मागील निवडणुकीच्या वेळेस मध्यंतर झालेल्या ‘संगीत भाऊबंदकी’च्या प्रयोगाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यनगरीत मुळा-मुठेच्या तीरावर केली. कुठलाही आशय नसलेल्या, विषय हरविलेल्या आणि दिशा नको असलेल्या बेचव सभेला फोडणी देण्यासाठी त्यांनी महायुतीत सामील न होण्यामागच्या कारणाची (सनक्कल) जंत्री सादर केली. जणू काही या आवतणाची वाटच पाहत असलेले शिवसेनेचे ‘मर्द’ कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तोच धागा पुढे चालवला व त्यांना पेलवेल अशा इर्षेने प्रत्युत्तर दिले. त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी मेनूच सादर केला. त्यावेळी त्यांनी जे तपशील दिले, त्यानुसार पाचवीत असताना माझे दोन चॉकलेट कशाला खाल्ले किंवा लहानपणी रेल्वेतून जाताना खिडकीशी जागा कशी मिळू दिली नाही, अशा आठवणीच यायच्या बाकी होत्या.
त्याची परिणती शेवटी दोन्ही सेनांना प्राणप्रिय असलेल्या प्रत्यक्ष हाणामारीत झाली. सख्खा भाऊ पक्का वैरी या मराठमोळ्या म्हणीला जरा वेगळे वळण देऊन ठाकरे बंधूंनी चुलत भाऊ पक्के वैरी अशी स्थिती तयार केली आहे.
उद्धव व राज एकमेकांशी कसे भांडतात, वडा आणि चिकन सूपमध्ये अधिक चविष्ट व पौष्टिक काय इत्यादी मुद्यांवर लोकांनी यांना मतदान करावे, अशी यांची खरोखरच अपेक्षा आहे काय? पाच वर्षांपूर्वीची लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला उपद्रवमूल्य दाखवून झाल्यावरही अद्याप मनसेची औकात दाखविण्याची खुमखुमी मग राज ठाकरे का व्यक्त करतात? राज ठाकरेंनी कितीही दुगाण्या झाडल्या तरी आपण केवळ विकासाच्या प्रश्नावर बोलू, अशी ठामेठोक भूमिका उद्धव का घेत नाहीत?
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या या पहिल्या निवडणुकीत त्यांच्या हळव्या आठवणी जागवून त्यांच्याशी एकनिष्ठ शिवसैनिकांची मते पळविण्याचा राज यांचा प्रयत्न आहे, कबूल. त्यांना तो हक्क आहे, हेही कबूल. पण त्यासाठी काही पातळी पाळली पाहिजे, हे ते कबूल करणार का नाही. उद्धव यांच्यासाठी तर बाळासाहेबांचे नामसंकीर्तन या पलीकडे दुसरा अजेंडाच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अन्य कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवणे म्हणजे आपल्याच बुद्धीवर शंका उपस्थित करण्याजोगे आहे.
दिवंगत नेत्याच्या स्मृतीवर मते मागण्याचे काम केवळ ठाकरे बंधूच करत आहेत, असे नाही. तमिळनाडूत एम. जी. रामचंद्रन यांच्या जुन्या करिश्म्याच्या आधारावरच जयललितांनी तीनदा सत्तेत एंट्री आणि एक्झिट केली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी करुणानिधी द्राविड चळवळीच्या आणाभाका घेऊन रामस्वामी पेरियार व अन्नादुराईंच्या नावाने पदर पसरतात. आंध्र प्रदेशात तेलुगु देसम पक्ष अशाच प्रकारे एनटी रामारावांना वापरतो. मुलायम सिंहांपासून लालू प्रसादांपर्यंत सर्व यादव, राम विलास पासवानांसारखे दलित नेते आणि नितीश कुमारांसारखे स्वयंभू नेतेही राम मनोहर लोहिया यांच्याच नावाने मते मागतात. खुद्द दिल्लीत काँग्रेस आतापर्यंत नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या आठवणी व इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या (चर्चास्पद) बलिदानाची आण घालूनच मतदारांना आळवणी करतात.
मात्र, निवडणुकीचा मुहूर्त साधून बाळासाहेबांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी सार्वजनिक सभांमध्ये करण्याची कला केवळ ठाकरे बंधूंनीच विकसित केली आहे. खरे तर राजकीय पक्षांना, मग ते कोणत्याही बाजूचे असोत, सध्या उचलण्यासाठी मुद्दे अगदी पैशाला पासरी आहेत. नुकतीच झालेली गारपीट, महागाई, राज्यातील खालावलेली कायदा व सुव्यवस्था, मुडदुससदृश आजार झालेले प्रशासन, राज्यकर्त्यांची अनास्था अशा कितीतरी मुद्यांचे आयते ताट खरे तर विरोधी पक्षांसमोर मांडलेले आहे. मात्र, दैव देते अन् कर्म नेते अशी वृत्ती दाखविण्याचाच चंग एखाद्याने बांधला असेल, तर त्याला आपण काय करणार.
स्वर्गीय बाळासाहेबांच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर हा दळभद्रीपणा झाला!
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा