कल्पना करा रविवारचा निवांत दिवस… दोन पिशव्या दुचाकीत ठेऊन भाजी आणण्याकरता मंडईत जावे. वाहन लावावे आणि आत शिरावे, शिरताक्षणी ‘काय गोड मटार आहे’ तर पलीकडून ‘लांबसडक गवार आहे’ मागून ‘बघाल तर घ्याल, बिटरूट लाललाल’ टोपीवाले म्हणतात ‘नाही खोटे नाटे, अस्सल तळेगावचे बटाटे’ पागोटेवाल्यांनी तर हाताला धरून न्यावे आणि ‘बघा कलंदर, काकडी एक नंबर’ म्हणत हातावर काकडीचा एक तुकडा कापून ठेवावा. कुणाच्या शेंगाच्या ढिगाऱयात गुलाब खोचून ठेवलेला. कुणाच्या बीटरुटमध्ये अध्यात्मिक धूपकांडे खोचलेले, तर कुणी टोमॅटो गाजराला वापरून प्राण्यांच्या प्रतिकृती केलेल्या. कुणी रेडिओवर जोरजोरात हिंदी गाणी लावलेली, तर कुणी टीव्हीच आणून ठेवलेला. सगळ्यांचा हेतू एकच. गि-हाईक आपल्याकडे यावं आणि आपला माल खपावा…
येवढ्या प्रचंड गदारोळात गि-हाईकच जे होत, त्याला डोक्याची मंडई होणे, असं म्हणतात. हा काही मराठी भाषेतील पारंपरिक वाकप्रचार नाही. पण प्रचंड गोंधळाला लागू होणारी ही चपखल उपमा आहे.
भारतीय राजकारणाच्या पटलावर गेल्या काही दिवसांपासून जे चालले आहे ते मंडईप्रमाणे आहे. राजकीय घटनांची अफाट आवक, नेत्यांचा रेटा आणि मतदाराच्या डोक्याची मंडई. राजकारण पूर्वी होत नव्हते, असे नाही. राजकीय मंडळींना विश्रांती घेऊन कशी चालेल? पण आत्ता इतका माहितीचा महापूर नव्हता. क्रिया, प्रतिक्रिया, परिषदा, जाहीरसभा यांचा आगडोंब अंगावर येत नव्हता. आत्ता मात्र वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स, सोशल मीडिया यांची दहीहंडीला लाजवेल, अशी चेंगराचेंगरी झाली आहे. आणि या मीडियाच्या लाटेत प्रत्येक नेता आपली होडी ठेऊ पाहतोय. कॉंग्रेसच्या जाहिराती सुरू आहेत. राहुल गांधीच्या आक्रमक सभा होतायत. पाच वर्षे तोंडात आग गोळा करून आत्ता त्यांनी जोरात फू केले आहे. त्यांच्या मुलाखतीची नवनवीन विडंबने रोज वाचायला मिळतायत. त्यामुळे विमनस्क होऊन त्यांचेच सेनापती मीडियाला ठेचायला निघालेत. कुणी कुणाला नरसंहारक म्हणतोय. कुणी चायवाला म्हणतोय, कुणी नपुंसक म्हणतोय.
भाजपकडून मोदीच तारणहार असल्याचे सांगितले जातंय. गुजरातमधील विकासाचा चौघडा वाजतोय. मध्येच मुस्लिमांची माफी त्यावर कॉंग्रेसचा हल्ला मग शिवसेनेचा माफीनाम्याला विरोध.
तिसऱया आघाडीचा तोच तोच पडेल प्रयोग.
करातांचे प्रश्न, गौडांचे उत्तर,
नितीशकुमारांच्या हाताला मुलायम सिंगांचे अत्तर,
जयललितांच्या तोंडी नक्की कुणाची गाणी,
शिंपडतायत सगळे मायावतींवर गुलाबपाणी,
कोणती तपश्चर्या आली फळाला,
थेट अण्णा लागले ममतांच्या गळाला!
काय करणार तिसरी आघाडी म्हंटल की आपोआप काव्यच सुचतं. कविकल्पनाच ती…
त्या गोंधळात टिपेचा स्वर लावलाय नवीन आम आदमी पार्टीनं. अरविंद केजरीवाल आणि कंपनीने प्रस्थापितांविरुद्ध महायुद्ध पुकारल्याचं वातावरण निर्माण केल आणि अमर्त्यसेनपासून सर्व विद्याविभूषितांनी व्यवस्थेविरुद्ध भूकंप घडवून आणणारा सागरमंथन करून निलकंठ झालेला हाच तो भगवान शंकर, अशी हाकाटी पेटवून दिली.
राज ठाकऱय़ांनी टोलखोलचा मार्ग पकडला. मुंडेंनी पवारविरोधाचा मंत्र दिला. तर गडकरींनी टोल हवा सांगितलं आणि दुसऱयाच दिवशी राज ठाकरेंबरोबर एकाच व्यासपीठावर जाहीर प्रकट दिन साजरा केला.
एवढी मंडई होऊनसु्द्धा विश्लेषक म्हणतायत, आगे आगे देखो होता है क्या… परमेश्वरा तूच आहेस रे आता…
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)
– रवि पत्की
sachoten@hotmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा