ही गोष्ट आहे शैला काकूंची…काकूंना वयाच्या विसाव्या वर्षांपासूनच सगळे काकू म्हणतात. कारणच तसं आहे, त्यांनी विसाव्या वर्षांपासूनच केटरिंगचा व्यवसाय सुरू केला. वाट्टेल तेवढय़ा कष्टाची तयारी आणि जिभेवर साखर ठेऊन आज पस्तीसाव्या वर्षी त्या केटरिंगच्या व्यवसायातलं अग्रगण्य नाव आहेत. केटरिंगमध्ये पण त्यांचं स्पेशलायझेशन पोळ्यांमध्ये. रोज हजारो पोळ्या करून अनेक खानावळींना सप्लाय करणे, हा त्यांचा जबरदस्त जम बसलेला व्यवसाय आहे. आज त्यांच्याकडे पन्नास महिला पोळ्या करण्याकरीता येतात. संपूर्ण भारतात त्यांच्या पॅकबंद पोळ्या रोज हजारोंनी पोचतात.
घरची मंडळी बाहेरगावी गेल्याने मी काकूंकडे पोळ्या आणायला गेलो. काकूंचे स्वयंपाक घर पूर्वी सारखेच होते. लाकडी जिन्यात दुसऱ्या मजल्यावर गेलो. काकू बाहेर फोनवर बोलत होत्या. स्वयंपाकघरात वीस स्त्रिया पोळ्या लाटत होत्या. प्रत्येकीने सहा तास पोळ्या लाटायच्या. भिंती शेगडय़ांच्या धुरामुळे काळ्या झालेल्या काही शेंगडय़ावर भले मोठे तवे ठेवलेले. त्यावर एका वेळेस चार पोळ्या होत होत्या.
मला पाहिल्याबरोबर काकू म्हणाल्या, अरे किती वर्षांनी आलास! पूर्वी आई आजारी असली की पोळ्या न्यायला यायचास. आता बऱ्याच दिवसांनी काय बऱ्याच वर्षांनी आलास. बस बस, पा़णी पी, चहा घेतोस का कफी? नको मी पाणी घेतो. अरे काकूंच्या स्वयंपाकघरात येतोस आणि लाजतोस. चहा घेतलाच पाहिजे. मदन दोन कप चहा आण रे. मदन चहा आणायला गेला.
काकू म्हणाल्या, परवाच तुझी आठवण झाली होती. लहान असताना तुम्ही प्लॅनचेट करायचा ना आमच्याकडे. तू आणि आमचा सुशील. प्लॅनचेटमधून कुणा कुणाला बोलायला लावायचा तुम्ही. माझ्या दिवंगत आजीला, काकांना एवढंच काय माझ्या रूममधल्या कपाटाला देखील बोलायला लावलं होतस तू.
आता असंच काम आहे तुझ्याकडे. बोला काकू काय? अरे त्याच काय आहे तुला माहीत आहे माझ्याकडे भारतातल्या काना कोपऱ्यातले खानावळवाले पोळ्यांची ऑर्डर देतात.
एक खानावळवाले आहेत १९८९ सालापासून. त्यांच्या भारताच्या उत्तरेत आणि महाराष्ट्रात खानावळी आहेत. दक्षिणेत त्यांना अजून फार डिमांड नाही. त्याना प्युअर हापूस आंब्याच्या पोळ्या लागतात त्यामुळे ते केशरी रंगाचा मँगो पल्प आणून देतात. त्यांच्या गिऱ्हाईकांना भारी आवडतात. आंब्याच्या केशरी पोळ्या. आमचं दुसरं मोठ गिऱ्हाईक भारताच्या सर्व भागात खानावळी असलेल्या आहेत. त्यांना पालकाचे हिरवे पराठे लागतात. हे खानावळवाले गेली शंभर वर्षे आमचे गिऱ्हाईक आहे. ते म्हणतात, आमच्या गिऱ्हाईकांना चवीचं काही नाही. मात्र, पोळ्या हिरव्यागार असल्या की बास. त्याकरीता पालक, मेथी सगळं वापरतो आम्ही. आमचं तिसरं गिऱ्हाईक नवीन आहे. त्यांना फक्त मैद्याच्या रोटय़ा लागतात. पांढऱ्या स्वच्छ. थोडासाही डाग नको रोटीवर. त्यांच्यासारखे पूर्वी बरेच होते. पण त्यांना वाटतं आपण पहिलेच.
पण अरे गेल्या एक महिन्यापासून गंमतच होतीये. केशरी, हिरवी, पांढरी कोणतीही पोळी तव्यावर लाटून टाकली की काही सेकंदात जळतीये. काळी ठिक्कर पडतीये. मी रोज फोन करून या खानावळीवाल्यांना सांगतीये. पोळ्या बिघडल्या. व्यवसाय बंद व्हायची वेळ आलीये. धर्मसंकट आलंय. तू एक काम कर प्लँचेट करून तव्याला बोलायला लाव. असं का होतंय विचार. आज एवढं करच.
आता धर्मसंकट माझ्यावर होतं. प्लँचेट कंस करायचं मी विसरलो होतो. थोडा डोक्याला ताण दिला. काकूंना म्हणालो, बघूया जमतं का. सगळ्या स्त्रियांना स्वयंपाकघरातून बाहेर काढलं. दाराला आतून कडी लावली. तव्याजवळ जाऊन माहिती असलेले मंत्र म्हणालो. एक पोळी लाटून तव्यावर टाकली. दोन मिनिटांत तवा पोळीशी बोलू लागला.
आलीस का तू परत. थांब जाळतोच तुला. वर्षांनुवर्षे हे खानावळवाले माझ्याकडून तुला भाजून घेतायत. तुझ्यातल्या सारणामध्ये थोडासा पण बदल नाही. गिऱ्हाईकांना काय पाहिजे, कोणत्या चवीचं आवडेल काही विचार आहे का नाही. त्याच त्या आंबा, पालक, मैद्याच्या पोळ्या भाजून देतोय मी. गिऱ्हाईकांच्या गरजा, आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे मी ठरवलंय आता मी तुला भाजणार नाही जाळणारच. पोळीला खडसावल्यावर तवा मला म्हणाला जा जाऊन सांग खानावळीवाल्यांना चवी बदलल्या आहेत. लक्षात घ्या नाही तर खानावळी बंद पडल्या म्हणून समजा.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

Story img Loader