काही वर्षांपूर्वी इंडोनेशियातील सुरबाया शहरात एका पोलाद कारखान्यात मी ‘पाट्या टाकत’ असताना एकदा मित्रांबरोबरच्या ‘महफिल-ए-याराँ’त इंडोनेशियातील ‘बिंतांग’ बियरचे घोट घेत चकाट्या पिटत अगदी वायफळ गप्पा मारत होतो. त्यावेळी सहज सुरबायामधील कंपन्यांमधील त्यावेळच्या ‘सीईओ’सारख्या उच्च पदावर असलेल्या ‘साहेब लोकां’चा विषय निघाला! एकाएकी माझ्या असं लक्षात आलं की ही सर्व मंडळी बिनमिशांची होती! अगदी अपवादार्थही कुणी मिशाळ माणूस उच्च पदावर नव्हता! ही सत्यस्थिती अगदी ‘कट्यारी’सारखी माझ्या ‘काळजात घुसली’ आणि मी जेव्हा ही गोष्ट तिथे जमलेल्या माझ्या मित्रांना सांगितली तेव्हा टाचणी पडली तरी ऐकू जाईल, अशी शांतता पसरली. भारतीय (आणि त्यातही मराठी) लोकांत एकमत होणे अशक्यच. पण या विषयावर मात्र ताबडतोब एकमत झाले व सर्व मित्रांनी एकमुखाने टाळ्यांच्या गजरात माझ्या निरीक्षणाचे कौतुकपर स्वागत केले.
अशा तर्‍हेने जगातल्या बर्‍याच पद्धतींप्रमाणे ‘काळे पद्धती’चा जन्म ध्यानी-मनी नसताना अचानक झाला. कधी सफरचंद खाली पडल्याचं निमित्त तर कधी थर्मामीटर फुटून पारा बाहेर पडल्याचे! पण अपघाताने जन्मलेल्या या पद्धतीच्या खरेपणाची, उपयुक्ततेची व ती किती व कुठे लागू पडते, याची चाचणी करून ही पद्धती प्रगत करताना मात्र मी खूप कष्ट व अभ्यास केला आहे. सद्यकालीन परिस्थिती, जगाचा अर्वाचीन इतिहास व बिनतोड युक्तिवाद यांच्यावर आधारित संशोधनावर व सखोल अभ्यासावर आज ही पद्धती आधारलेली आहे. गमतीची गोष्ट अशी की या पद्धतीची प्रचीती पाहण्यासाठी फारसे कष्ट करावे लागत नाहीत इतकी ती जागोजागी दिसून येते. पाहा कसे ते! पण आधी ही काळे पद्धती म्हणजे काय ते पाहू!
काळे पद्धती थोडक्यात सांगायची असेल, तर ‘ज्याचा वरचा ओठ साफ तो यशस्वी’ या सहा शब्दांत सांगता येईल. म्हणजेच या जगात यशस्वी होऊन पुढे जायचे असेल तर मिशी ठेवणे, ही यशाच्या मार्गातली धोंड ठरते व ती ठेवणार्‍याने एरवी कितीही प्रयत्न केले तरी हाती यश येत नाही. वर मी अर्वाचीन इतिहासाचा उल्लेख मुद्दाम केला आहे कारण रक्तपाताच्या यातनांशिवाय सहजपणे श्मश्रू करायची आयुधे उपलब्ध होण्याआधीच्या (जिलेटपूर्व) काळातील घडामोडींचा काळे पद्धतीची उपयुक्तता पडताळण्यात मी अंतर्भाव केलेला नाही. कारण त्या काळात पुरुष वर्ग दाढी-मिशा ठेवायचा. त्यात मर्दानगीपेक्षा श्मश्रू करताना होणारा रक्तपात व त्या पायी होणार्‍या यातनाच जास्त जबाबदार होत्या. मला अजूनही आठवते कीं जमखंडीच्या माझ्या शाळेत आमचे गुरूजी गुळगुळीत दाढी करवून आले की आम्हा विद्यार्थ्यांच्या पोटात गोळाच यायचा व एक ’सावधाऽऽन’ची आरोळी दिली जाई. कारण विनाकारण छडीमार व्हायचा आणि कधी-कधी कानफाडातही बसायची. म्हणूनच या सखोल अभ्यासात ‘जिलेटपूर्व’ युग धरलेले नाही.
सखोल अभ्यास केल्यावर हेही लक्षात आले कीं मिशांना counter balance म्हणून दाढीही वाढविल्यास मिशांचे दुष्परिणाम होत नाहींत व अशा घटना ‘काळे पद्धती’त मोडत नाहींत.
मग मी या विषयावर अधिक सखोल संशोधन सुरू केले. त्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती निवडल्या. संशोधनांत जेव्हा ठिकठिकाणी व वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रांत या पद्धतीच्या सत्यतेची प्रचीती आली, तेव्हाच मी हा लेख लिहिला व या पद्धतीचे ‘काळे पद्धती’ असे नामकरण केले. काळे पद्धतीची पहिली आवृत्ती मी १९८८ साली लिहिली व त्यानंतर माझे संशोधन जसजसे व्यापक होत गेले व जसजशी यात नव्या माहितीची भर पडत गेली, तसतशी मी या लेखाची सुधारित आवृत्ती प्रकाशित करीत गेलो. उदाहरणार्थ ९० साली दोन वर्षे पुण्यात राहत असताना औद्योगिक जगातल्या अव्वल नेत्यांची उदाहरणे निघाली. ९२-९७ सालांच्या कालावधीत जकार्ता व मलेशियातील नेत्यांची उदाहरणे मिळाली. तसेच या नूतनतम आवृत्तीत पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली जरदारी यांच्या उदाहरणाची भर घातली गेली. एकूण हे संशोधन खूप प्रचंड आहे व ते पूर्ण लिहिणे आणि प्रकाशित होणे जरा कठीणच. म्हणून ही संक्षिप्त आवृत्ती इथे दिली आहे.
हा अभ्यास म्हणजे वरचा ओठ साफ ठेवून यशस्वी झालेल्यांची व वरचा ओठ साफ नसल्यामुळे अयशस्वी राहिलेल्यांची गाथाच आहे.
आता जरा जगाच्या व भारताच्या अर्वाचीन इतिहासाकडे पाहू या. आज अमेरिका एकमात्र ’सुपर-पॉवर’ का आहे? जरा त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडे नजर टाका! फ्रॅंकलिन रुजवेल्ट, ट्रूमन, आयसेन हॉवर, केनेडी, लिंडन जॉन्सन, निक्सन, फोर्ड, कार्टर, रेगन, बुश-१, क्लिंटन, बुश-२ व नवनिर्वाचित ओबामा या सर्वांत काय साम्य आहे? एकच! हे सारे नेते बिनमिशीचे आहेत. दोन्ही पिता-पुत्रांच्या नावात बुश असला, तरी ओठावर बुश (bush) नाही. सगळे एकजात क्लीन-शेव्हन! काळे पद्धतीचा असा काही पगडा अमेरिकन राजनैतिक क्षेत्रावर पडला आहे की खुद्द् राष्ट्राध्यक्षाची निवडणूक तर सोडाच, पण कुठलाही पक्ष, डेमोक्रेटिक असो वा रिपब्लिकन, साध्या ‘मुन्शिपाल्टिच्या’ निवडणुकीतही मिशाळ माणसाला उमेदवारीही देत नाहीत! मला खात्रीलायक सूत्रांकडून कळले आहे की दर चार वर्षांनी होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या शर्यतीत एखादा मिशाळ माणूस चुकून जरी घुसू पाहू लागला, तर पक्षश्रेष्ठी (’आला कमान’) त्याला सांगतात,”आधी तुझ्या मिशा उतरव, तरच तुला न्यू हॅम्पशायरच्या प्रायमरीत उतरता येईल!”
आज आर्थिक क्षेत्रात अमेरिकेशी बरोबरी करू पाहाणारे चीन व जपान या राष्ट्रांच्या नेतृत्वाकडे पाहिल्यास ‘काळे पद्धती’ची किती व्यापक प्रमाणावर ‘लागण’ झाली आहे, हेच दिसून येते.
इंग्लंडच्या पंतप्रधानांचा इतिहास गमतीदार तर आहेच, पण त्यांची उदाहरणेही ‘काळे पद्धती’सिद्ध करतात. ज्या पंतप्रधानाने बलाढ्य ब्रिटीश साम्राज्यावर उदक सोडले ते क्लेमेंट ऍटली मिशाळ होते, चेंबरलेनही मिशाळ होते, पण इंग्लंडला दुसर्‍या महायुद्धांत पराभवाच्या खाईतून बाहेर काढून विजयाचा मंगल कलश आणून देणारे विन्स्टन चर्चिल बिनमिशीचे होते. पुढे ऍटलीला पराभूत करून ते पुनश्च दुसर्‍यांदा पंतप्रधानही झाले.
खूप इतिहासतज्ज्ञांत एक चुकीची कल्पना रूढ आहे की रशियावर स्वारी केल्यामुळे हिटलर दुसरे महायुद्ध हरला. काही इतर इतिहासतज्ज्ञांच्या मते पर्ल हार्बरवर हल्ला करण्याऐवजी जर जपान्यांनी रशियाच्या व्लाडिवोस्टोकवर हल्ला करून रशियन सेना पूर्वेकडे खेचली असती तर हिटलरने आरामात दुसरे महायुद्ध जिंकले असते. पण ही दोन्ही कारणे कमालीची उथळ आहेत! हिटलरची वाट लावली त्याच्या ‘हिटलर-कट’ मिशांनी! अमेरिका-इंग्लंडकडील रुझवेल्ट, चर्चिल, द गॉलसारख्या बिनमिशांच्या नेत्यांपुढे (अपवाद ‘हॅंडलबार’ स्टॅलिनचा) ऍक्सिस गोटातील हिटलर व जपानी टोजो यांच्यासारख्या मुच्छड सेनाधिकार्‍यांचा कसा पाड लागणार? ते कसे विजयी झाले असते? (अपवाद मुसोलिनी) ‘आत्याबाईला मिशा असत्या तर’ ऐवजी ‘हिटलरला मिशा नसत्या तर’ हा मुद्दाच महत्वाचा. त्याने जर वेळीच आपल्या वरच्या ओठांवरची लव उडवली असती तर दुसर्‍या महायुद्धाचा निकाल पार वेगळा लागला असता, असे मी ठामपणे सांगू इच्छितो. तसेच स्टॅलिन बिनमिशीचा असता तर हे युद्ध इतके सहा वर्षे रेंगाळलेच नसते. जर मिशाळ नेव्हिल चेंबरलेन यांची इंग्लंडच्या पंतप्रधानपदावरून उचलबांगडी झाली नसती व त्यांच्या जागी बिनमिशीचे चर्चिल आले नसते, तर एकही गोळी न झाडता हिटलर विजयी झाला असता.
तसेच इतिहासाचा नीटपणे अभ्यास न केलेल्या इतिहासकारांना असे वाटते की सुएझ कालव्यावर इंग्लंडची पकड जागतिक राजनैतिक मतविरोधापुढे नमून सुएझ युद्धांतून माघार घेतल्यामुळे सुटली. पण किती लोकांना ऍन्थनी ईडनला मिशा होत्या याची माहिती आहे? जर हॅरोल्ड मॅकमिलनला मिशा नसत्या तर हेलेन कीलर प्रकरणी गुंतलेल्या व त्यावेळी संरक्षणमंत्री असलेल्या ‘प्रोफ्यूमो’ प्रकरणापायी त्यांची कारकीर्द अशी अकाली संपली नसती. हे काहीच नाही. ब्रिटिश पंतप्रधानपदी वर्षानुवर्षे बसलेल्या व एक धूर्त राजकारणी समजल्या जाणार्‍या हेरॉल्ड विल्सन यांनी तरुणपणी (गद्धेपंचविशीत) मिशा ठेवल्या होत्या. पण या चतुर माणसाने वेळीच ‘काळे पद्धती’ आचरणात आणली व त्यांना पंतप्रधानपदाची खुर्ची खुणावू लागल्याचे त्यांनी आपल्या मार्गातील ही धोंड वस्तर्‍याच्या एका फटाकार्‍यात दूर केली व पंतप्रधानपद जिंकले! त्यांची या पदावरची पकड इतकी मजबूत होती की थॅचरबाईंच्या आगमनापर्यंत सर्वांत अधिक काळ पंतप्रधानपद सांभाळण्याचा विक्रमसुद्धा त्यांच्याच नावावर होता.
निवडणुकीच्या मार्गाने सत्तास्थानी आलेल्या नेव्हिल चेंबरलेन, क्लेमेंट ऍटली, सर ऍंन्थनी ईडन, मॅकमिलन या मिशाळ ब्रिटिश नेत्यांच्या कारकीर्दी क्षणभंगुरच ठरल्या. एक-दोन अपवाद आहेत पण ते मूळ पद्धतीला पूरकच ठरतात. जॉन मेजर यांना मिशा होत्या की नाही हे गूढच आहे. टीव्हीवर पाहाता असे वाटते की त्यांना मिशा होत्या. पण जकार्ता येथील ब्रिटिश दूतावासात केलेल्या चौकशीनुसार त्यांना मिशा नव्हत्या. एक सुमार कर्तृत्वाचा नेता तसा खूप दिवस पंतप्रधानपदी टिकला याचे हेच एकमेव कारण!
माझे संशोधन मी केवळ ऐतिहासिक व भौगोलिकच नव्हे तर लिंगभेदसीमांच्या पलीकडे जाऊनही केलेले आहे. ‘स्वच्छ उर्ध्व ओठां’ची स्त्रीजात ही अजिबात अबला वगैरे नसून चांगली खमकी आहे. (अर्थात विवाहित पुरुषांना हे सांगायला नकोच!) स्वत: पुरुष असलेल्या देवाने असे का केले, हे समजायला मार्ग नाही, पण ही ‘आ बैल, मुझे मार’वाली चूक देवाच्या हातून एखाद्या एखाद्या बेसावध, गाफील क्षणी घडलीच! त्याने स्त्रियांच्या ओठावर लव दिली नाही, पण ऍडमला मात्र मिशा देउन पिढ्यान्‌ पिढ्या त्याच्या नशिबी पराजय लिहून ठेवला. त्यामुळे जेव्हा-जेव्हा स्त्रियांनी हाती सत्ता घेतली तेव्हा-तेव्हा त्यांची कारकीर्द यशस्वी व दीर्घ मुदतीची झाली. त्यात मार्गारेट थॅचर, इंदिरा गांधी, सिरिमावो बंदरनायके गोल्डा मायर (यांनाही घातपाती मृत्यू आला) अशी कितीतरी नावे घेता येतील.
पाकिस्तानकडे पाहिल्यास पहिल्या-वहिल्या (व आजपर्यंत तरी एकुलत्या एक) महिला पंतप्रधान बेनझीर भुत्तोंचे नावही याच यादीत मोडते व त्या जर एका अतिरेक्याच्या गोळीला बळी पडल्या नसत्या तर त्यांच्या मिशाळ पतीच्या जागी त्याच तिसर्‍यांदा निवडणूक जिंकून पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या असत्या व आजही सत्तेवर असत्या. त्यांच्याबरोबर लढून अनेकदा पंतप्रधानपदी निवडून आलेले नवाज शरीफही बिनमिशांचेच आहेत. फक्त ‘दोन नकारांचा अंत होकारा’त होतो या न्यायाने जरदारी-गिलानींच्या मिशीवाल्या ’जोडी’कडे पहाता येईल! पाकिस्तानची ‘वाट’ लावणारे सारे लष्करशहा (ज. अयूब खान, ज. झिया उल हक व ज. मुशर्रफ) मिशाळच होते व ‘अपवादाने पद्धती सिद्ध करणारे’ एकुलते एक लष्करशहा होते पाकिस्तानचे दोन तुकडे पाडणारे ज. याह्या खान!
भारताचे उदाहरण घ्या! मिशीवाले माजी पंतप्रधान शास्त्री यांनी त्यांच्या छोट्याशा कारकीर्दीत खूप कीर्ति मिळवली, पण त्यांची कारकीर्द फारच छोटी ठरली. शास्त्रींच्या आधीचे पंतप्रधान नेहरू व नंतरच्या इंदिराबाई हे ’क्लीन-अपर-लिप’ जातीत मोडतात. त्यांनी खूप वर्षे गादी चालवली. पण त्यानंतरचे मुच्छड विश्वनाथ प्रताप सिंग ११ महिन्यांतच गारद झाले. खरे तर चंद्रशेखर यांनी दाढी व मिशा दोन्ही ठेवल्या होत्या, तरी ते जेमतेम काही महिनेच टिकले. पण नंतर आलेल्या बिनमिशीच्या नरसिंहरावांनी मात्र सिक्सरच मारली. लायसेन्स-राज नष्ट करून भारताला जागतिक बाजारपेठेत स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे करणार्‍या या अर्वाचीन ‘नरसिंहावतारा’चा अविस्मरणीय महिमा काय वर्णावा? माझ्या मते ते आतापर्यंतच्या भारताच्या पंतप्रधानांत सर्वोत्तम पंतप्रधान आहेत. केवळ ते ‘योग्य’ घराण्यात जन्मलेले नसल्याने त्यांना हक्काचे श्रेय मिळाले नाही व नरसिंहराव यांचे केवळ आज्ञापालन करणार्‍या एका सनदी नोकराला त्याचे श्रेय दिले गेले. पण रावसाहेबांच्या या उज्ज्वल यशामागील त्यांची ’नसलेली मिशी’ फक्त माझ्यासारख्या संशोधकालाच दिसली.
भाजपाच्या आला कमानने वेळेवर ’काळे पद्धती’कडे लक्ष देउन या बाबत ठोस पावले उचलली असती तर आडवानी पंतप्रधान झाले असते व भारताच्या लोकशाहीचा इतिहासच त्यांनी बदलला असता!
आणखी एक महत्वाची गोष्ट ऐका. मी या लेखाची प्रथमावृत्ती लिहिली तेंव्हा मी ज्या कारखान्याला उर्जितावस्था आणण्यात गुंतलो होतो त्याचे मालक एक उदयोन्मुख कारखानदार होते व मिशा ठेवत असत. काही दिवसासाठी मी पुण्यात त्यांच्या बंधूंच्याबरोबर काम करत असताना मी हा लेख आमच्या कंपनीच्या नियतकालिकात लिहिला होता. तो त्यांच्या वाचनात आला असावा. जस-जसे त्यांचे पोलाद-साम्राज्य वाढू लागले तशी एकाएकी त्यांची मिशी नाहीशी झाली! काळे पद्धतीच्या यशस्वितेबद्दल याच्यापेक्षा जास्त चांगले उदाहरण माझ्याकडे नाही! मी जेव्हा माझ्या कारकीर्दीबद्दल सर्वंकष विचार करतो तेव्हाही एक गोष्ट माझ्या लक्षात येते की मिशीवाल्या ’सीईओ’बरोबर जेव्हा मला काम करावे लागले, तेव्हा मला यश कमी मिळाले व सफाचट ’सीईओ’बरोबर काम केले तेव्हा मला भरभऱून यश मिळाले.
‘काळे पद्धती’च्या यशाचे कारण काय असावे? माझ्या मते याचा अर्थ बिनमिशाचे लोक यशस्वी होतात असा नसून लोक जसजसे यशस्वी होऊ लागतात तसतसा त्यांना मिशा कोरायला वेळ मिळेनासा होतो व ते मिशा उडवतात किंवा दाढी-मिशा दोन्ही वाढवतात!
‘काळे पद्धती’ २०१४ च्या निवडणुकांना लागू पडेल? केजरीवाल यांचे मराठी अनुयायी हा लेख वाचून त्यांना वेळीच सावध करतील काय? घोडा-मैदान जवळच आहे!
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)
– सुधीर काळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा