पराभवाच्या भीतीने ग्रासलेल्या काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत उभे राहण्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. केंद्रीय मंत्री जी के वासनपाठोपाट आता माजी केंद्रीय मंत्री के व्ही थंगबाळू यांनीही गुरुवारी निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेस गोटात खळबळ उडाली आहे.
तामिळनाडू राज्यात काँग्रेस पक्षाबरोबर कोणताही राजकीय पक्ष आघाडी करण्याबाबत अनुकूल नाही. त्यामुळे काँग्रेसला एकाकीपणे निवडणुकीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर पराभवाच्या भीतीने अनेक काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीतून काढता पाय घेण्याचे धोरण अवलंबिले आहे. प्रथम केंद्रीय नौकानयनमंत्री जी के वासन यांनी निवडणुकीतून माघार घेतली, तर आता माजी प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या थंगबाळू यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. थंगबाळू यांनी आपण निवडणूक लढण्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट केल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. याबाबत त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही आपला निर्णय कळविला आहे. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार धक्का बसला होता. याची जबाबदारी स्वीकारत थंगबाळू यांनी प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
उमेदवार निश्चितीसाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दिल्लीतील बैठकीच्या पाश्र्वभूमीवर अर्थमंत्री पी चिदंबरम, माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी, कंपनी खात्याचे मंत्री सचिन पायलट, पंजाब काँग्रेस अध्यक्ष प्रतापसिंग बाजवा यांनी निवडणूक लढण्यास तयार नसल्याचे नमूद केले आहे. यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघातून पी चिंदबरम यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला, तर त्यांच्या जागी वाणिज्य खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री सुदर्शना नचियाप्पन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. १९९९ च्या निवडणुकीत नचिय्यापन यांनी चिदंबरम यांचा पराभव केला होता, तर दुसरीकडे लुधियाना मतदारसंघातून निवडून आलेल्या मनीष तिवारी यांना चंदिगडची जागा हवी आहे. मात्र या जागेवर माजी केंद्रीय मंत्री पवनकुमार बन्सल हे उमेदवार आहेत. एका घोटाळ्याप्रकरणी बन्सल यांनी गेल्या वर्षी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
पक्षाची प्रतिमा मलीन म्हणून?
निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांमध्ये काँग्रेसची प्रतिमा तितकी चांगलीशी नसल्याचे समोर आले आहे. तामिळनाडू, राजस्थान आणि पंजाबमध्ये पक्षाबाबत चांगले वातावरण नसल्याने पक्षाच्या नेत्यांनी निडवणुकांपासून दूर राहण्याचा निश्चय केला आहे.