‘ शाई पुसा आणि दोनदा मतदान करा’, असा अजब सल्ला मतदारांना देणाऱ्या शरद पवारांकडे विरोधकांबरोबरच निवडणूक आयोगाचेही लक्ष वळले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पवार यांच्या ‘त्या’ वादग्रस्त भाषणाचा अहवाल निवडणूक आयोगास पाठविण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गद्रे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना, गेल्या लोकसभा निवडणुकीत घोटाळा झाला होता. कारण मुंबई आणि साताऱ्यात एकाच वेळी मतदान होते. यंदा साताऱ्यात १७ एप्रिलला, तर मुंबईत २४ तारखेला मतदान आहे. त्यामुळे तेथेही घडय़ाळावर शिक्का हाणायचा आणि इथेही शिक्का हाणायला यायचे. पण येताना पहिली शाई पुसून टाकायची, नाही तर घोटाळा होईल, असे वक्तव्य पवार यांनी केले होते. मात्र प्रकरण अंगाशी येताच तो विनोद होता, अशी सारवासारव त्यांनी केली.
केंद्रीय निवडणूक आयोगानेही पवार यांच्या वाद्ग्रस्त वक्तव्याची गंभीर दखल घेत अहवाल मागितला होता. त्यानुसार पवार यांच्या भाषणाची चित्रफित, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि पवार यांचा खुलासा याचा अहवाल आयोगास पाठविण्यात आला आहे. या भाषणाची सीडी तपासून पवार यांच्यासंदर्भातील निर्णय आयोग घेईल, असे नितीन गद्रे यांनी सांगितले. त्यामुळे पवारांबाबत आयोग काय निर्णय घेतो याकडे राष्ट्रवादीबरोबरच विरोधकांचेही लक्ष लागले आहे.
या वक्तव्यावरून पवारांना खिंडीत पकडण्यासाठी शिवसेना- भाजप-रिपाई- आप आदी विरोधी पक्षांनीही जोरदार आघाडी उघडली आहे. मतदारांना दोनदा मतदान करण्याचा सल्ला देणाऱ्या पवार यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची मान्यताही रद्द करण्याची मागणी भाजप आणि आपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. हा निव्वळ विनोद होता, अशी सारवासारव पवार यांनी केली असली तरी त्यानी आजवर निवडणुका कशा जिंकल्या ते त्यांच्या पोटातून ओठावर आल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar cd of the speech at delhi