दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना न थकता जनतेची ‘अविरत सेवा’ करता यावी, या उद्देशाने त्यांच्या सरकारी बंगल्यात तब्बल ३१ वातानुकूलित यंत्रे, १५ डेझर्ट कूलर्स, १६ हवा शुद्धीकरण यंत्रे, १२ गीझर आणि २५ हीटर अशी खास व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी त्या वेळी आलेला एकूण खर्च १६ लाख ८१ हजार इतका होता, अशी माहिती केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
माहिती अधिकाराखाली दिलेल्या अर्जात ही माहिती उघड झाली आहे. दिल्लीतील ३-मोतीलाल नेहरू मार्गावरील बंगल्यात दीक्षित राहात होत्या. आता तिथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राहात आहेत.
केरळच्या राज्यपाल म्हणून दीक्षित यांची नियुक्ती झाल्यानंतर या बंगल्यातील हलवण्यात आलेल्या विजेवरील उपकरणांची यादी विभागाने दिली आहे. परंतु केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार ही सर्व यंत्रणा बंगल्यात असलेल्या विविध सरकारी कार्यालयांसाठी अंशत: वापरली जात होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच ती बसवण्यात आली होती, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बंगल्यातील सर्वच यंत्रणा नियमित वापरात नव्हती, परंतु जेव्हा जेव्हा सरकारी कामांसाठी तिची आवश्यकता भासत होती तेव्हा तिचा वापर केला जात होता, असे स्पष्ट करण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अगरवाल यांनी ही माहिती मागवली होती.
३५ लाखांची डागडुजी
तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या शीला दीक्षित यांना १९२० साली सुमारे साडेतीन एकर जागेवर बांधलेला चार बेडरुम असलेला बंगला देण्यात आला होता. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना हा बंगला सोडावा लागला. त्यानंतर त्यांना मध्य दिल्लीतील फिरोजशहा मार्गावरील तीन बेडरुम असलेला खासगी फ्लॅट देण्यात आला आहे. सध्या मनमोहन सिंग राहात असलेल्या बंगल्याचे नुकतीच डागडुजी करण्यात आली. यासाठी ३५ लाख रुपये खर्च आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा