राज्यातील दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होणाऱ्या १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे आदी दिग्गजांची कसोटी लागणार आहे. देशात आतापर्यंत चार टप्प्यांत चांगले मतदान झाल्याने राज्यातही मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील (१२), मराठवाडा (सहा) आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या कोकणातील एक अशा १९ मतदारसंघांत उद्या मतदान होत आहे. गारपीटीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान या पट्टय़ातच झाले होते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीचा सत्ताधाऱ्यांना काही प्रमाणात फटका बसू शकतो. विरोधकांनी या मुद्दय़ावर सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चार हजार कोटींचे जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारात भर दिला. सहकार क्षेत्राची पाळेमुळे रुजलेल्या पश्चिम महाराष्ट्रात नरेंद्र मोदी घटक हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभांना चांगली गर्दी झाली होती. याउलट राहुल गांधी यांच्या सभांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी सर्व मतदारसंघांचा दौरा करून मोदी यांनाच लक्ष्य केले होते. सत्ताधाऱ्यांच्या सर्व जाहीर सभांमध्ये मोदी हा एकमेव मुद्दा होता.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहा मतदारसंघांमध्ये सरासरी ६५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. देशात आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यात सर्वत्रच चांगले मतदान झाले. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मतदान वाढेल, अशी चिन्हे आहेत. विदर्भ किंवा देशाच्या अन्य भागांमध्ये अल्पसंख्यांक मतदानाचे प्रमाण वाढले होते. मराठवाडय़ातही अल्पसंख्याक मतदान वाढावे, असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.
उद्या मतदान होणाऱ्या मतदारसंघांपैकी सर्वाधिक लक्षणीय लढत ही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात होणार आहे. निलेश राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलेली असहकाराची भूमिका, काही काँग्रेसजनांचा विरोध यामुळे पुत्राला निवडून आणण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांची सारी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बीडमध्ये भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुरेश धस यांनी जोर लावला. मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय रंग या मतदारसंघात देण्यात आला. मुंडे यांना राज ठाकरे यांचा पाठिंबा घ्यावा लागल्याने मुंडे यांच्यासाठी लढाई सोपी नाही हाच संदेश त्यातून गेला.
दुसऱ्या टप्प्यात दिग्गजांचे भवितव्य ठरणार
राज्यातील दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होणाऱ्या १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे आदी दिग्गजांची कसोटी लागणार आहे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-04-2014 at 01:51 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
Web Title: Shinde munde chavan supriya sule in fray as maharashtra goes to poll for 2nd phase