विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्या असल्या तरी शिवसेनेशी युती तोडण्यासाठी भाजपमध्ये दबाव वाढत आहे. मुंबईसह कोकणातील काही पदाधिकाऱ्यांनीही बुधवारी प्रदेश सुकाणू समितीपुढे हा आग्रह धरला. पण शिवसेनेशी राजकीय युती नसून विचारांवर आधारित युती असून ती भक्कम आहे आणि महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र किमान १४४ जागांसाठी भाजप आग्रही असून शिवसेनेने मान्य न केल्यास युती तुटण्याचे संकेतही दिले जात आहेत. याचाच भाग म्हणून, राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश सुकाणू समितीच्या विभागवार बैठका सुरू आहेत. ठाणे वगळता मुंबईसह कोकणातील पदाधिकाऱ्यांकडून या समितीने निवडणूक तयारीचा आढावा घेतला. शिवसेनेच्या युतीबाबतही भाजपकडून चाचपणी होत आहे. मुंबईत भाजपकडे केवळ १३ जागा असून किमान १८ जागा मिळाव्यात, असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधील बहुतांश जागा शिवसेनेकडे असल्याने तेथील भाजप पदाधिकाऱ्यांना सत्तेची संधीच मिळत नाही. त्यांचे राजकीय भवितव्य व संधी कायम डावलली जाणार का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.शिवसेनेशी युती अभेद्य असल्याची ग्वाही प्रदेश भाजप नेते देत असले तरी समाधानकारक जागावाटप न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपची संघटनात्मक बांधणी सर्व मतदारसंघात सुरू करण्यात आली असून २५ जुलैपासून सर्व केंद्रीय मंत्री प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भएटी देऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांवर थेट प्रत्येक मतदारसंघात जाण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून देण्यात आल्याने केंद्रीय नेतृत्व स्वबळावर लढण्याची तयारीही गंभीरपणे करीत असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी त्या तूर्तासच असून राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्यावर आणि जागावाटप चर्चा झाल्यावरच युतीचा अंतिम निर्णय होईल. तोपर्यंत शिवसेनेला झुलवत ठेवले जाणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
पदाधिकारी नाराज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळूनही त्याचा उल्लेखही न करणाऱ्या शिवसेनेकडून प्रत्येक वेळी भाजपला अपमानास्पद वागणूक दिली जाते. हे किती काळ सहन करायचे, असा सवाल काही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.