अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह शिवसैनिकांच्या विरोधात चारित्र्यहननाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी शिवसैनिकांनी येथील गाडगेनगर पोलीस ठाण्याला घेराव घालून गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी खोटी तक्रार करून अडसूळांची बदनामी केल्याची फिर्याद सेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.
वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या नवनीत राणा आणि शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यात बाचाबाची झाली. त्यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी विनयभंग, जातीवाचक व अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मंगळवारी कार्यक्रम प्रसारित केल्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहोचून नवनीत राणा यांची तक्रार खोटी असल्याचा दावा केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नवनीत राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात अडसूळ यांची मानहानी झाली असून राणा यांचे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याआधारे नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी विनंती वानखडे यांनी केली आहे.
नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून खा. अडसूळ आणि इतरांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कृती निंदनीय असून पोलीस उपमुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप अभिजीत अडसूळ यांनी केला.