रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे ऊमेदवार अनंत गिते यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त करत कोकणात शिवसेनेसाठी अवघड जागेचे दुखणे बनलेल्या रामदास कदम यांना ठाण्याच्या मोहीमेवर पाठविण्याचा निर्णय मातोश्रीवरुन घेण्यात आला असून एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे काहीसे एकटे पडलेल्या राजन विचारे यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आमदार एकनाथ शिंदे आणि रामदासभाईंमधील राजकीय सख्य हा नेहमीच शिवसेना वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. कल्याणात आपल्या चिरंजीवाच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे शिंदे ठाण्याच्या मोहीमेविषयी फारसे गंभीर नसल्याच्या तक्रारी मातोश्रीवर पोहचू लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर कदम यांची ठाण्यात नियुक्ती करुन एका दगडात दोन पक्षी मारण्याची खेळी सेना नेतृत्वाने केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाने युती तोडल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार अनंत गिते यांना यंदाची लोकसभा निवडणुक सोपी राहीलेली नाही. त्यातच मराठा समाजातील रामदास कदम यांनी गिते यांची उमेदवारी जाहीर होताच उघड बंडाचा पवित्रा घेतल्यामुळे सेनेतील अस्वस्थता उघड झाली होती. अशा वेळी ठाणे-कल्याणमधील राजकीय घटनांमुळे हा प्रश्न सोडविण्यात सेना नेतृत्वाला काही प्रमाणात यश आले आहे.
अशाप्रकारे वेगवेगळ्या मतदारसंघाची जबाबदारी बाहेरील नेत्याकडे सोपविण्याची पद्धत सेनेत नवी नाही. मात्र, रायगड आणि ठाण्यातील गणिते लक्षात घेता नाराज असलेल्या रामदासभाईंना खेडमधून हलवून ठाण्यात पाठविण्याची खेळी करण्यात आली आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी तसेच ओवळा-माजीवडा भागात खेड, रत्नागिरी पट्टयातील मतदारांचा मोठा भरणा आहे. त्यामुळे भाईंना ठाण्यात पाठवून गितेंचा ताप कमी करण्यात आला आहे.
याशिवाय एकनाथ शिंदे यांनाही हा सूचक इशारा असल्याची शिवसेना वर्तुळात चर्चा आहे.

Story img Loader