लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेची पक्षबांधणी झाली असून आता निकालानंतर मतदानाचा अभ्यास करून ज्या ठिकाणी पक्षबांधणी भक्कम करण्याची गरज आहे तेथे विशेष लक्ष देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. देशात मोदीसरकार आल्याचा फायदा होणार असला तरी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी शेवटच्या मतदारापर्यंत कसे पोहोचता येईल व त्यासाठी प्रचारतंत्राच्या प्रभावी वापराबरोबरच थेट मतदारांपर्यंत संपर्क साधण्यासाठी भक्कम यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे सेनेच्या एका नेत्याने सांगितले.
यावेळी कोणत्याही परिस्थितीत मंत्रालयावर भगवा फडकविण्यासाठी सेनेने तळागाळापर्यंत पक्षबांधणी भक्कम करण्यावर भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभा व लोकसभानिहाय मतांचा अभ्यास करून सेनेने गटप्रमुखांच्या माध्यमातून प्रचारयंत्रणा राबवली होती.
शरद पवार यांना आगामी विधानसभेतील चित्र दिसत असल्यामुळेच ते अस्वस्थ झाले असून त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले. तथापि गेल्या एक तपाच्या काँग्रेस-आघाडीच्या कामगिरीमुळे ते जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरलेले असल्यामुळे आमचे काम सोपे असल्याचे सुभाष देसाई म्हणाले. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता कोणत्याही परिस्थितीत येणारच, असे सांगताना मनसेविषयी बोलण्यासारखे काहीही नसल्याचा टोलाही देसाई यांनी हाणला. मनसे हा केवळ बोलघेवडय़ांचा पक्ष असून विधायक काही करण्याची धमकच त्या पक्षात नाही, हे लोकांच्या लक्षात आल्यामुळे विधानसभेतही मनसेचे सुपडे साफ झालेले दिसेल असे सेनेच्या एका नेत्याने सांगितले.

निकालानंतर मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतांचा अभ्यास करून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तेथे पक्षाचे काम प्रभावी करण्यात येईल,
सुभाष देसाई ,शिवसेना नेते

Story img Loader