शिवसेनेची लोकसभा निवडणुकीची १५ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या शिवसेना नेते मनोहर जोशी यांना सक्तीची निवृत्ती देत मनसेला टक्कर देऊ शकतील, असे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांना तिकीट देण्यात आले आहे. या यादीत सहा नवे चेहेरे असून तरुणांना प्राधान्य देण्यात आले आहे.
दादारच्या गडावर मनसेने कब्जा करून सातही नगरसेवक जिंकून आणल्याचे शल्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दृकश्राव्याच्या माध्यमातून व्यक्त केले होते. सेनेचा हा गड परत मिळविण्यासाठी दक्षिण मध्य मतदारसंघात विजय मिळणे आवश्यक असून त्यासाठी राहुल शेवाळे यांच्यावर सेनेने विश्वास टाकला आहे. मनसेला अटकाव करण्यासाठी मुंबई व ठाण्यात लोकसभेतही सेनेचे वर्चस्व राहिले पाहिजे, या भूमिकेतून उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपपाठोपाठ शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत गजानन कीर्तिकरांचा अपवाद वगळता मुंबई व ठाण्यामधून सगळेच्या सगळे नवे चेहेरे देण्यात आले आहेत. शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांना शिवसेनेतून हद्दपार करण्यात आल्यानंतर दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, अनंत गीते, भावना गवळी, सुभाष वानखेडे, प्रतापराव जाधव आणि आनंदराव अडसूळ यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या गुरुदास कामत यांच्याकडून पराभूत झालेले गजानन कीर्तिकर आणि रामटेकमधून थोडक्यात पराभूत झालेल्या कृपाल तुमाणे यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे मतदारसंघातून आमदार राज विचारे यांना तर शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख  आमदार एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
स्वाभिमान शेतकरी संघटनेसाठी हातकणंगले मतदारसंघ सोडण्यात आला असून तेथून राजू शेट्टी लढणार आहेत. तर सातारा मतदारसंघ रिपाइंसाठी सोडण्यात आल्याचे उद्धव यांनी सांगितले.

लोकसभेसाठी शिवसेनेचे १५ उमेदवार जाहीर
दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, दक्षिण मध्यमुंबई- राहूल शेवाळे, उत्तर मध्य मुंबई- गजानन कीर्तिकर, ठाणे- राजन विचारे, कल्याण- डॉ. श्रीकांत शिंदे, औरंगाबाद-चंद्रकांत खैरे, हिंगोली-सुभाष वानखेडे, परभणी- संजय जाधव, अमरावती-आनंदराव अडसूळ, बुलढाणा-प्रतापराव जाधव, यवतमाळ-भावना गवळी, रामटेक- कृपाल तुमाणे, शिरूर-शिवाजीराव आढाळराव-पाटील, रायगड- अनंत गीते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- विनायक राऊत,