शिवसेनेने बोलावे आणि भाजपने डोलावे हा काळ आता पडद्याआड गेला आहे. आता भाजप आक्रमकपणे बोलेल आणि शिवसेना केवळ डोलेल, अशी भाषा ऐकू येऊ लागली आहे. गरज पडल्यास रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे आदींचे पक्ष सोबतीला घेण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे.
महायुतीतील रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम या पक्षांनीही जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. भाजपला केवळ सत्ताच नव्हे तर थेट मुख्यमंत्रीपदही हवे आहे. महायुतीच्या या साऱ्या राजकीय कोलाहालात शिवसेनेचा आवाज कुठेच ऐकू येत नाही. काहीही बोलायचे नाही, हा सुद्धा एक राजकीय डावपेचाचा भाग असला तरी, गेली २५ वर्षे आपल्या इशाऱ्यावर भाजपला डोलायला लावणारी शिवसेना गप्प कशी अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महायुतीतील एक घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाच्या सोमवारी पार पडलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने महायुतीत भाजप बहुमतात व शिवसेना अल्पमतात जात असल्याचे दिसले. जानकर यांच्या मेळाव्याला रिपाइंचे अविनाश महातेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, कोळी महासंघाचे रमेश पाटील आदी नेते उपस्थित होते.  सुभाष देसाई यांचे कार्यक्रमपत्रिकेवर नाव होते, परंतु ते आजारी असल्याने आले नाहीत, असे सांगण्यात आले. मात्र शिवसेनेचा अन्य कुणीही नेता, तिकडे फिरकला नाही. मेळाव्याचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि अध्यक्षस्थानीही आमदार पंकजा मुंडे-पालवे होत्या. महायुतीतील घटक पक्षाच्या प्रत्येक नेत्याने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली अर्पण केली.
दोन-अडीच  वर्षांपूर्वी रामदास आठवले यांनी शिवसनेशी हातमिळवणी केली. परंतु त्यांना राज्यसभेची खासदारकी भाजपने दिली. महादेव जानकर, राजू शेट्टी, विनायक मेटे यांना मुंडे यांनी महायुतीत आणले. माढा व बारामतीच्या आपल्या वाटय़ाच्या दोन जागा भाजपने सदाभाऊ खोत व जानकर यांच्यासाठी सोडल्या. शिवसनेने साताऱ्याची जागा रिपाईंच्या गळ्यात मारली.
हातकणंगले ही जागा शिवसेनेची होती, परंतु राजू शेट्टी यांनी जिंकलेली ती जागा होती. त्यामुळे शिवसेनेची घटक पक्षांना तशी काहीच मदत झाली नाही. उलट साऱ्यांवर भाजपचेच उपकाराचे ओझे आहे. रासपच्या मेळाव्यातील नेत्यांच्या भाषणातून ते स्पष्टपणे जावणत होते.

Story img Loader