दादर येथील शिवसेना भवनात शिवसेनेचा एकएक नेता येत होता. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता, उत्सुकता दिसत होती. कारणही तसेच होते. राज‘पूर्ती’च्या गडकरी उद्योगाने महायुतीपुढे अस्तित्वाचा प्रश्न उमटला होता. मनसेला मोठे करण्याचे काम नितीनभौंनी हाती घेतल्याची चीड प्रत्येक चेहऱ्यावर दिसत होती. प्रश्न होता तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय देतात याचाच.. उद्धव यांनी दाखवलेल्या ठामपणा आणि संयमाने पदाधिकाऱ्यांचा ताण हलका झाला..
जे स्वत:ला चाणक्य समजतात, ते प्रत्यक्षात ‘राज’कीय चकणे आहेत. ते बघतात कोठे आणि करतात काय हे समजणे कठीण आहे.. हे सारे त्यांच्या पोटदुखीतून आले असले तरी  भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी माझे बोलणे झाले आहे. सारे काही व्यवस्थित होईल, असे सांगत उद्धव यांनी गडकरींचे नाव न घेता चौफेर फटकेबाजी केली. शिवसेना-भाजपची युती ही नैसर्गिक युती आहे.
हिंदूत्वाच्या व्यापक पायावर ती उभी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापासून राजनाथ सिंह यांच्यापर्यंत सर्वाशी माझे बोलणे झाले आहे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राजीवप्रताप रुडी हे सायंकाळी मातोश्रीवर येऊन मला भेटले.तुम्ही ताकदीने कामाला लागा, असे उद्धव म्हणाले.
अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना वाजपेयी यांनी बाळासाहेबांना दूरध्वनी करून मंत्रिमंडळात सेनेच्या कोणाचा समावेश करू अशी विचारणा केली. तेव्हा तुम्हाला अनेकांना सामावून घ्यायचे आहे असे सांगून बाळासाहेब म्हणाले, आपली युती ही मंत्री किती बनतील यावर अवलंबून नाही. हिंदुत्व आणि जनताभिमुख कामावर आधारित आहे. त्यामुळे माझ्या लोकांना मंत्रिमंडळात घेणे शक्य होणार नसेल तरी चालेल, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती, अशी आठवणही उद्धव यांनी सांगितली.
आताही गोपीनाथ मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उत्तम संवाद असल्यामुळे महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. चकण्यांचे जे काही उद्योग सुरू आहेत तो प्रश्न लवकरच निकाली निघतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्धव यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे बैठकीसाठी आलेल्या राज्यातील सेनानेते व पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता पळून गेली.