शेकापने युती तोडण्याची भूमिका घेतल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेतील सत्तेबद्दल काय भूमिका घ्यायची याबाबतचा निर्णय शिवसेना मंगळवारी घेणार आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता माणगाव येथे शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक होत आहे.
शिवसेना शेकापची युती गेली ८ वर्षे रायगडमध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह आमदार, खासदारकीच्या निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्रितरीत्या आजपर्यंत लढवीत होते. मात्र या वेळी लोकसभा निवडणुकीत शेकापने शिवसेनेपासून फारकत घेऊन मावळ व रायगड लोकसभा मतदारसंघातून आपले उमेदवार उभे केले आहेत.
त्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेकडून नाराजीचा सूर उमटत असून, जर एकत्र राहायचे नसेल तर जिल्हा परिषदेतील सत्तेतून शेकापने बाजूला व्हावे, अशी भूमिका सेनेकडून मांडली जात आहे. जिल्हा परिषदेबाबत शेकापने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी शिवसेनेकडून निर्णय घेण्यात येणार आहे.