येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची खरी लढाई ही विरोधकांपेक्षा पक्षातून फुटलेल्या गद्दारांबरोबर आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकविल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. ज्या पक्षाने लहानाचे मोठे केले, तेच आता स्वत:चा पक्ष काढून राष्ट्रवादीच्या तालावर नाचत आहेत. स्वत:च्या ताकदीवर ज्यांना मते मिळत नाहीत, त्यांनी यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे नाव वापरले आणि आता मोदींच्या नावाने मते मागत आहेत. त्यांचे हे मोदीप्रेम बेगडी आहे. प्रेमामागे दोन्ही काँग्रेसला मदत करण्याचे षड्यंत्र आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेतला केला.
ऐरोली  येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा रोख पक्षाबाहेर गेलेल्यांवरच होता. शिवसेनेची स्थापना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱ्या पक्षातून फुटून आलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन केलेली नाही. हा पक्ष नेहमीच निखाऱ्यांवर चालत आलेला आहे. त्यामुळे शिवबंधन मर्दाच्या मनगटावर शोभून दिसते, नामर्दाच्या नाही. नार्वेकरसारख्यांच्या पक्षातून जाण्याने शिवबंधनाचा धागा सैल होणार नाही, असे ते म्हणाले.
गुजरात दंगलीवरून मोदींवर टीका करणारी काँग्रेस शीख दंगल, कार सेवकांची कत्तल हे मुद्दे विसरत असल्याचे ते म्हणाले. मुंब्रा येथील कोम्बिंग ऑपरेशन करताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांना सोडून द्यावे लागले. दहशतवादी इशरत जहाँला निर्दोष सोडणारे आणि साध्वी प्रज्ञा सिंगला तुरुंगात डांबणारे सरकार आता पुन्हा येता कामा नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.