आंध्र प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते जगनमोहन रेड्डी यांनी सभागृहात असंसदीय शब्द वापरल्याने निर्माण झालेला तिढा शनिवारीही कायम होता. असंसदीय शब्द मागे घेण्यास जगनमोहन यांनी स्पष्ट नकार दिला आणि वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांसह सभात्याग केला. त्यामुळे हा गदारोळ संपुष्टात आणण्याचे अध्यक्ष के. शिवप्रसाद राव आणि कामकाजमंत्री वाय. रामकृष्णनुडू यांचे प्रयत्न फोल ठरले.
तथापि, आमदारांविरुद्ध असंसदीय शब्द वापरल्याबद्दल जगनमोहन यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी आग्रही मागणी सत्तारूढ तेलुगू देसम पक्षाच्या सदस्यांनी केली. विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात अशा प्रकारचे वक्तव्य करणे टाळावे आणि सत्तारूढ सदस्यांनीही आपले वर्तन सुधारावे, असे शिवप्रसाद राव म्हणाले.
जगनमोहन यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी सत्तारूढ सदस्यांनी केली आहे. आपण वादग्रस्त शब्द मागे घ्यावे, कामकाजात त्यांची नोंद होणार नाही, आता अंतिम निर्णय आपल्या सदसद्विवेकबुद्धीवर सोडत आहोत, असे शिवप्रसाद राव यांनी जगनमोहन यांना सांगितले.
कामकाजमंत्र्यांनीही यापूर्वीची उदाहरणे देत विरोधी पक्षनेत्यांना दिलगिरी व्यक्त करण्याची किंवा असंसदीय शब्द मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र विरोधी पक्षांचे सदस्य ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.