नालंदा जिल्ह्य़ात निवडणूक प्रचारादरम्यान दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिशेने चप्पल तसेच दगड भिरकावल्याच्या घटना सोमवारी घडल्या. नितीश कुमार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नालंदामध्ये जेडीयूची निवडणूक मिरवणूक जात असताना वीज तसेच रस्ते आदी मूलभूत सुविधा पुरविण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत एका निदर्शकाने नितीश कुमार यांच्या दिशेने दगड भिरकावला. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. दुसऱ्या एका घटनेत खुश्रुपूर भागात पटना साहेब मतदारसंघाचे उमेदवार गोपाल प्रसाद सिन्हा यांचा प्रचार करून नितीश कुमार हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना एका निदर्शकाने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले.
मतदानाचे प्रक्षेपण अन् गैरप्रकारांवर लक्ष
नवी दिल्ली : संकेतस्थळाच्या माध्यमातून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया थेट पाहा आणि नियमांचे उल्लंघन होताना आढळल्यास तात्काळ आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्या, असे आवाहन निवडणूक आयोगाने मतदारांना केले आह़े त्यासाठी शक्य तितक्या मतदान केंद्रांवरील प्रक्रि येचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करावी, असे आदेश आयोगाने सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत़
तसेच या कार्यवाहीसाठी तांत्रिक साहाय्य देण्याचे आदेश राज्य प्रशासनांना देण्यात आले आहेत़ तसेच यंत्रणेत आयत्या वेळी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मतदानाच्या किमान दोन दिवस आधी यंत्रणेची तपासणी करण्यात यावी, असेही आयोगाने बजावले आह़े
‘मोदींनी माफी मागण्याची गरज नाही’
नवी दिल्ली : २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी माफी मागण्याची गरज नाही. विरोधकांनी त्यांच्याविरोधात चुकीचा प्रचार सुरू केला असून त्या पाश्र्वभूमीवर मोदींनी माफी मागण्याची गरज नसल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी सोमवारी म्हटले. मोदींनी गुजरात दंगलीच्या कृत्याची कबुली द्यावी, असे माफी मागणाऱ्यांची भूमिका आहे. मात्र त्यांनी खरोखरच चूक केली असेल तर माफीऐवजी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून शिक्षाच व्हायला हवी, असे जेटली यांनी काही परदेशी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
रावत यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले
नवी दिल्ली: इमारत बांधकामासाठी आर्थिक मदत जाहीर करण्याच्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या घोषणेची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. रावत यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे सांगत त्यांनी मंगळवापर्यंत आपले स्पष्टीकरण सादर करावे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. रावत यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत आपले स्पष्टीकरण सादर केले नाही तर निवडणूक आयोग कोणतीही पूर्वकल्पना न देता, तसेच रावत यांचे म्हणणे न ऐकता पुढील कार्यवाही करील, असेही निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिशीत नमूद केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा