भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात नवे सरकार स्थापन होण्याचे संकेत मतदानोत्तर चाचण्यांमधून मिळाले असले तरी अमेरिकेने मोदी यांना व्हिसा देण्याबाबतच्या निर्णयावर अद्यापही मौन पाळले आहे.व्हिसा मंजूर करणे, अर्ज याबाबत आपण कोणत्याही प्रकारची चर्चा केली नसल्याने त्याबाबत सध्या सांगण्यासारखे काहीही नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन सॅकी यांनी वार्ताहरांना सांगितले.आर्थिक आणि अन्य महत्त्वाच्या कारणांनी आम्ही भारतासमवेतच्या संबंधांकडे पाहतो आणि दिवसेंदिवस हे संबंध अधिकाधिक दृढ व्हावेत, अशीच आमची इच्छा आहे, असेही त्या म्हणाल्या.
मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध
अहमदाबाद:मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजय मिळेल अशी शक्यता असल्याने आता गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू  झाला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ  मंत्री आनंदीबेन पटेल, नितीन पटेल, सौरव पटेल, मोदींचे निकटवर्तीय अमित शहा तसेच संघटन सचिव भिकू दलसानिया यांची नावे आहेत.राज्य भाजपने मात्र मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर म्हणजे १६ मेनंतर होईल असा पवित्रा घेतला आहे.
राष्ट्रवादीला स्थिर ,निर्णायक सरकार हवे
नवी दिल्ली:लोकसभा निवडणुकीत भाजप स्पष्ट बहुमत मिळवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच यूपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने देशात स्थिर व निर्णायक सरकार पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही लोकनिर्णयाचा आदर करतो, त्यामुळे जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असेल. मात्र देशात अस्थिर सरकार नको. स्थिर सरकारच देशाचा गाडा नीटपणे हाकू शकते, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
भाजपशी युतीची शक्यता तृणमूलने  फेटाळली
कोलकाता :लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपशी युती करण्याची शक्यता तृणमूल काँग्रेसने फेटाळून लावली. पश्चिम बंगालमध्ये २००९ पेक्षा यंदा तृणमूलला अधिक जागा मिळतील, असा विश्वासही पक्षाचे नेते डेरेक ओब्रायन यांनी व्यक्त केला. तृणमूल काँग्रेसने गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करीत १९ जागा पश्चिम बंगालमधून जिंकल्या होत्या.
डाव्या पक्षांची आज देशव्यापी निदर्शने
नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार केले असून हिंसाचारही घडविला असा आरोप डाव्या पक्षांनी केला आहे.निवडणुकीच्या पूर्वसंध्येवर तृणमूलने दहशत पसरवली आणि त्याला राज्यातील यंत्रणा आणि पोलिसांचे सहकार्य होते, असा आरोप माकप, भाकप, क्रांतिकारी समाजवादी पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांनी केला आहे.

Story img Loader