केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून निर्माण झालेला वाद अधिकाधिक चिघळत चालला आहे. भाजप आणि काही केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरच सवाल केला असून त्याला जद(यू)नेही साथ दिली आहे; तर काँग्रेसमध्येही या प्रश्नावरून दोन तट पडले आहेत. स्मृती इराणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन भिन्न वेळी दोन भिन्न शैक्षणिक तपशील नमूद केल्यामुळे त्यांना ‘विस्मृती’ झाली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
महिला हक्क कार्यकर्त्यां मधू किश्वर यांनी ट्विट करून या वादाला तोंड फोडले. स्मृती इराणी यांना मनुष्यबळ विकासमंत्री केल्याबद्दल किश्वर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. भारतातील शिक्षण आणि संशोधन दोलायमान स्थितीत असल्याने त्याचा दर्जा उंचावण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, असेही किश्वर म्हणाल्या.
दरम्यान, स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर टीका करणाऱ्या काँग्रेसला भाजपने चांगलेच फटकारले आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आता उद्धटपणा सोडून द्यावा आणि आत्मचिंतन करावे, असे भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.
स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर सवाल उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची शैक्षणिक पात्रता काय, असा सवाल भारती यांनी केला आहे.
प्रतिज्ञापत्रातील विसंगती
स्मृती इराणी यांनी दिल्लीतील चांदनी चौक मतदारसंघातून २००४ मध्ये निवडणूक लढविताना दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्याकडे बीएची पदवी असल्याचे म्हटले होते. त्या वेळी निवडणूक अर्जातील रकाना भरताना इराणी यांनी आपण बीए, १९९६, दिल्ली विद्यापीठ (दूरस्थ विभाग) असे नमूद केले होते. मात्र २०१४ मध्ये निवडणूक अर्जातील रकाना भरताना इराणी यांनी बी.कॉम., प्रथम वर्ष, मुक्त शिक्षण विभाग, दिल्ली विद्यापीठ, १९९४ असे म्हटले आहे. प्रतिज्ञापत्रात असत्य माहिती दिल्यास उमेदवारी अर्ज नाकारला जाऊ शकतो.