लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा निव्वळ बंडलबाजी असल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. काँग्रेस न पाळली जाणारी आश्वासनेच देत आहे तर केंद्र आणि नितीशकुमार सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बिहारचा विकास खुंटला असून ते मतांचे राजकारण करीत असल्याचा आरोपही मोदी यांनी केली. दरम्यान मोदींच्या बिहार दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी गया जिल्ह्य़ात बॉम्बच्या सहाय्याने दोन मोबाइल टॉवर उडवून दिले. यामुळे मोदीच्या सभांच्या ठिकामी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काँग्रेसने बुधवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र काँग्रेसचा हा जाहीरनामा म्हणजे निव्वळ बंडलबाजी आहे. कारण २००४ आणि २००९ मधील निवडणूक जाहीरनाम्यातीलच मुद्दे परत परत लोकांसमोर मांडत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षासाठी त्यांचा निवडणूक जाहीरनामा हा पवित्र गीतेप्रमाणे आणि कुराणाप्रमाणे असतो. मात्र काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे मोदी म्हणाले.
काँग्रेसच्या येथील उमेदवार मीरा कुमार यांच्यावरही मोदींनी टीका केली. राजकीय नेते २१ व्या शतकाची भाषा करतात, मात्र बिहार अंधारात राहिला. आपण पंतप्रधान झाल्यास बिहारमधील ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करण्यास प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले.  
केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत, त्यात शेतकरी भरडला जात असल्याची टीका मोदींनी केली. सरकार बदलल्यावर गतीने विकास होईल असे आश्वासन मोदींनी दिले.  
सभेदरम्यान लाठीमार
नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी झारखंड आणि बिहारमध्ये अनुक्रमे एक आणि दोन जाहीर सभांना हजेरी लावली. गया येथील सभेदरम्यान मोदींना जवळून पाहण्याच्या प्रयत्नात जमलेल्या गर्दीत गोंधळ उडाला. यावेळी जमावातून काही जणांनी पोलिसांच्या दिशेने पाण्याच्या रिकाम्या बाटल्याही फेकल्या. त्यामुळे पोलिसांनी किरकोळ लाठीमार केला.

Story img Loader