नरेंद्र मोदी यांची लाट नाही, असे काँग्रेसला वाटत असले तरी, मतदारांमध्ये मोदींची हवा आहे. महायुती त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. दक्षिण-मध्य मुंबई हा तसा एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला. २००४ च्या निवडणुकीत शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासारख्या तगडय़ा किल्लेदाराच्या हातून काँग्रेसच्या पायदळात काम करणाऱ्या एकनाथ गायकवाड नावाच्या सैनिकाने हा गड हिसकावून घेतला. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत हा गड काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात त्यांना यश मिळाले. तिसऱ्यांदा त्यांची मुख्य लढाई आहे ती शिवसेनेचे तरुण सैनिक राहुल शेवाळे यांच्याशी. प्रचारातला देखावा लक्षात घेतला तर शेवाळे यांनी गायकवाडांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
प्रत्यक्षांत गायकवाड व शेवाळे या दोघांनाही त्यांच्या-त्यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. गुरुदास कामत गट विरुद्ध एकनाथ गायकवाड गट या वादाने आता सनातनी रूप धारण केले आहे. त्याचा फटका गायकवाड यांना बसणारच नाही, असे नाही; तर मनोहर जोशी यांच्यासारख्या मोठय़ा व बुजुर्ग नेत्याला डावलून शेवाळेंना उमेदवारी दिली, याचे शल्य जोशी समर्थकांना सलत आहे. जोशी शेवाळेंच्या प्रचारात फारसे दिसले नाहीत. मोदींची हवा आणि काँग्रेसवरची नाराजी या जोरावर शेवाळे यांनी गायकवाड यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मनसेचे आदित्य शिरोडकर मराठी अस्मितेला बांधलेला मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणार. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा टोकदार बनवला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी निर्णायक ठरेल अशा दादर-माहीममधील मतदारांवर मनसेची मोहिनी पडली तर शेवाळेंसाठी ती मोठी अडचण ठरणार आहे.
* सहा विधानसभा मतदारसंघांपैकी धारावी, वडाळा, शीव-माटुंगा, चेंबूर हे चार मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. अणुशक्तीनगर राष्ट्रवादीकडे तर दादर-माहीम मनसेकडे आहे. शिवसेना पूर्णपणे उणे आहे.
* चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविलेले राहुल शेवाळे अनेकदा वादविवादाने चर्चेत आले.
* दादर, माटुंगा, नायगावचा काही परिसर वगळता झोपडपट्टय़ांनी वेढलेला हा मतदारसंघ आहे. दलित, मुस्लीम मतदार निर्णायक आहे. काँग्रेसची याच मतदारांवर सारी भिस्त आहे. मात्र सेनानेतृत्वानेही कल्पक खेळी करीत राहुल शेवाळे या दलित समाजातील कार्यकर्त्यांस उमेदवारी दिली आहे. शिवाय रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष सोबतीला घेऊन सामाजिक समीकरणे जुळविण्याची व्यूहरचना केली. ल्लधारावी या गायकवाड यांचे शक्तिस्थान असलेल्या त्यांच्या बालेकिल्ल्यावर हल्ला करण्याची रणनीतीही आहे. आठवले यांचे कार्यकर्ते शेवाळेंच्या प्रचारात उतरले असले तरी, शिवसेना-भाजपला मतदान करण्याची आंबेडकरी समाजाची मानसिकता बनल्याचे अजून तरी दिसत नाही.
दक्षिण मध्य : आव्हानाचा राजकीय त्रिकोण!
नरेंद्र मोदी यांची लाट नाही, असे काँग्रेसला वाटत असले तरी, मतदारांमध्ये मोदींची हवा आहे. महायुती त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
First published on: 23-04-2014 at 02:16 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South central constituency triangle political challenge