आम आदमी पक्षाने लोकसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीतील बहुतांश उमेदवार त्या त्या मतदारसंघांतच अनोळखी आहेत. काहीजण तर जणू बाहेरून आयात केलेत की काय, असे वाटण्यासारखी स्थिती आहे.
अमरावतीतून उमेदवारी मिळालेल्या भावना वासनिक या स्थानिक महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आहेत. अलीकडे पक्षासाठी नोंदणी अभियान सुरू करेपर्यंत त्यांचे नाव बाहेर कुणाला ठाऊक नव्हते. सर्वत्र परिचित असलेले शेतकरी संघटनेचे नेते विजय विल्हेकर यांचे काही दिवसांपूर्वी सुरू असलेले नाव येथे मागे पडले. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध भंडारा-गोंदिया मतदारसंघात लढणार असलेले प्रशांत मिश्रा आधी अमेरिकेत मायक्रोसॉफ्टमध्ये होते. पटेल यांच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात घेतलेले शिक्षण, एवढाच त्यांचा या भागाशी कधीकाळी आलेला संबंध. येथे बहुसंख्येने असलेल्या पोवार समाजाचे राजेंद्र पटले यांच्या नावाची येथे चर्चा होती. पण मिश्रांनी ऑनलाइन अर्ज भरला आणि उमेदवारी त्यांच्या पदरी पडली.
‘सांगलीसाठी निवड झालेल्या समीना खान वकील आहेत’. ‘मावळचे उमेदवार मारुती भापकर हे  माजी नगरसेवक असून माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते आहेत’. ‘जेपींमुळे प्रभावित झालेले आणि स्टेट बँकेचे माजी कर्मचारी असलेले ललित बाबर हे सोलापूरचे उमेदवार म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात लढणार आहेत’. ‘कांदिवलीत राहणारे दिलीप म्हस्के यांची झोपडी फार पूर्वी पाडली गेली आणि त्यानंतर त्यांनी पाच झोपडपट्टय़ांमधील रहिवांशासाठी लढा दिला’. त्यांचे आईवडील जालन्यात शेती करत होते, या धाग्यामुळे की काय त्यांना जालना मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. ‘औरंगाबादचे उमेदवार सुभाष लोमटे यांनी हमाल, बांधकाम मजूर आणि घरकामगार यांच्या शोषणाविरुद्ध काम केले असून मराठवाडा विकास आंदोलनाशीही त्यांचा संबंध होता’. मात्र, त्या-त्या मतदारसंघात वरीलप्रमाणे या सर्वाची ओळख मतदारांना ‘करून द्यावी’ लागणार आहे.
मतदारांना बऱ्यापैकी परिचित उमेदवारांची तीनच उदाहरणे आहेत. चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार वामनराव चटप हे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे लढाऊ कार्यकर्ते होते. स्वतंत्र भारत पक्षाच्या तिकिटावर येथूनच निवडणूक लढण्याचा अनुभव त्यांना आहे.
ठाण्यातील उमेदवार संजीव साने हे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य आणि समाजवादी जनपरिषदेशी संबंधित होते. पूर्वी केलेल्या काही आंदोलनांसह जनलोकपाल चळवळीतही ते सहभागी झाले होते. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’तील सकस अभिनय आणि ‘शिवाजी अंडरग्राऊंड.’ची झालेली चर्चा यामुळे प्रकाशझोतात आलेले नंदू माधव हे सामाजिक भानही असलेले कलाकार असले, तरी बीडच्या मतदारांसाठी ते नवखेच आहेत.

Story img Loader