आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचे वाहन गुजरातमध्ये अडवल्यानंतर संतप्त झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दिल्लीतील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करीत राडा केल्यामुळे तणाव पसरला. या राडय़ाचे वृत्त पसरताच लखनऊ, कोईमतूर आदी भागांमध्येही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. रोड शोसाठी परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे कारण पुढे करीत केजरीवाल यांना गुजरातमध्ये अडवण्यात होते. या घटनेने संतप्त झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणा दिल्या. तसेच नरेंद्र मोदी हे केजरीवाल यांना घाबरल्याचा आरोप करीत दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयाकडे धाव घेत दगडफेक केली. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही दगडफेक केल्याने परिस्थिती चिघळली. पोलिसांनी लाठीमार करून दंगेखोरांना पांगवले. मात्र, या घटनेचे तीव्र पडसाद देशातील अनेक भागांमध्ये उमटले.  

Story img Loader