माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे गूढ अधिकाधिक गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा संबंध इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आर्थिक गैरव्यवहारांशी असू शकतो, असे भाजपचे ज्येष्ठ  नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी डॉ. स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मृत्यूपूर्वी सुनंदा पुष्कर यांना आयपीएलमधील कोची टस्कर केरळ फ्रॅन्चायझीबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी उघड करावयाच्या होत्या. या बाबी उघड झाल्या असत्या तर अनेक उच्चपदस्थ आणि बडय़ा व्यक्तींचे पितळ उघडे पडण्याची शक्यता होती, असे डॉ. स्वामी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. शशी थरूर यांना या हत्येची माहिती होती, परंतु त्यांचा त्यामध्ये सहभाग नव्हता, असेही भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी डॉ. स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक स्थापन करावे. तसेच आयपीएलमधील आर्थिक गैरव्यवहारांबाबत पुष्कर माहिती उघड करणार असल्याने आणि काँग्रस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉवर्ट वढेरा यांचा त्यामध्ये सहभाग असल्याने पुष्कर यांच्या मृत्यूचा त्याच्याशी संबंध असण्याची शक्यता आहे, असेही डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे.

Story img Loader