महाराष्ट्राची लेक मध्य प्रदेशची सून असलेल्या सुमित्रा महाजन (ताई) यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. पंधराव्या लोकसभेप्रमाणे सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावरदेखील महिलेची निवड झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये ‘ताई’ या नावाने परिचित असणाऱ्या सुमित्रा महाजन मूळच्या चिपळूणच्या आहेत. सत्ताधारी भाजपसह एकूण १९ राजकीय पक्षांनी सुमित्राताई महाजन यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. खासदारांच्या शपथविधीची औपचारिकता पार पाडल्यानंतर सुमित्रा महाजन यांनी लोकसभा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. लोकसभेत अनेक वर्षांनंतर बहुमत असलेले सरकार अस्तित्वात आले आहे. शिवाय छोटय़ा विरोधी पक्षांची मोठी संख्या आहे त्यामुळे जबाबदारी वाढली असल्याची भावना सुमित्राताईंनी व्यक्त केली.
नूतन लोकसभा अध्यक्षांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात झालेली पहिली सार्वत्रिक निवडणूक व यंदाची निवडणूक यात साधम्र्य आहे. कारण १६ व्या लोकसभेत ३१५ सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत. सशक्त लोकशाहीच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले पाहिजे. लोकसभा अध्यक्षांच्या नावाचा अर्थ उलगडून दाखवताना मोदी म्हणाले की, सुमित्रा या नावातच मित्रत्वाची भावना आहे. त्यामुळे सभागृहातदेखील असेच मित्रत्वाचे वाततावरण राहील.   शिवाय ‘महाजन गत: सा पथ:’ अर्थात ज्या वाटेवरून महाजन जातात तोच पथ योग्य असतो. त्यामुळे सभागृहदेखील तुमच्याच वाटेवरून चालत राहील. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिाकार्जुन खरगे म्हणाले की, सर्वाच्या हक्कांचे संरक्षण या पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीला करावे लागते. ही जबाबदारी नव्या लोकसभा अध्यक्षा पार पाडतील, अशा विश्वास खरगे यांनी व्यक्त केला. हयात लेके चले, कायनात लेके चले, चले तो सबका साथ ले के चले, असा शेर प्रस्तुत करून खरगे यांनी महाजन यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. सुमित्रा महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेताना शिवसेना नेते व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी एक आठवण सांगितली. १९८९ साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या सुमित्रा महाजन यांचे बंधू मधू साठय़ेदेखील निवडणुकीच्या रिंगणात होते. पण ते पराभूत झाल्याव सुमित्रा महाजन जिंकल्या. तेव्हापासून सुमित्रा महाजन यांच्या कारकिर्दीची कमान सतत चढती राहिली आहे.  
सुमित्रा महाजन आपल्या भावनिक संबोधनात म्हणाल्या की, गेल्या पंचवीस वर्षांपासून मी लोकसभेची सदस्य आहे. हा क्षण जसा गौरवाचा आहे तसा जबाबदारीचादेखील आहे. माझ्यासाठी जे भावपूर्ण वक्तव्य विविध नेत्यांनी केले त्यामागे त्यांची अपेक्षा आहे. सभागृहात सर्वाना समान न्याय देण्यावर माझा भर राहील. मी मला सोपवलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू शकेल, असा मला विश्वास आहे.  
विरोधी पक्षनेतेपदाबाबत
अद्याप निश्चिती नाही
विरोधी पक्षनेता नेमणार का, या प्रश्नावर महाजन यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. त्या म्हणाल्या की, संसदीय कामकाजाच्या नियमांचा अभ्यास करूनच यासंबंधी बोलणे उचित राहिल. काँग्रेसकडून सभागृह नेतेपदाची जबाबदारी माजी मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांना सोपवण्यात आली आहे. त्यांनाच विरोधी पक्षनेता करण्यात येईल. मात्र अवघे ४४ सदस्य असल्याने संसदीय नियमाप्रमाणे विरोधीपक्षनेतेपदावर काँग्रेसला हक्क सांगता येणार नाही. त्यासाठी समनव्याने तोडगा काढावा लागेल. अद्याप नियमांचे अध्ययन सुरू असल्याचे महाजन म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा