१६व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड करण्यात आली. सुमित्रा महाजन यांची निवड ही सर्व महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षांच्या खासदारांनी महाजन यांच्या नावाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. या पदासाठी अर्ज करणाऱ्या महाजन या एकमेव उमेदवार असल्याने त्यांचीच या पदावर वर्णी लागणार हे निश्चित होते. मावळत्या अध्यक्ष मीरा कुमार यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा हे पद महिला नेत्याकडे सोपावले गेले आहे. निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया आज पार पडली.
कोण आहेत सुमित्रा महाजन
मध्य प्रदेशातल्या इंदूरमधून त्या तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या असल्या तरी सुमित्रा महाजन या मुळच्या चिपळूणच्या आहेत. चिपळून ही त्यांची जन्मभूमी आणि इंदोर त्यांची कर्मभूमी आहे. १९८९ पासून सुमित्रा महाजन खासदार म्हणून लोकसभेवर निवडून येत आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडाळातही महाजन यांनी काम केलं आहे. गणेश मावळकर, शिवराज पाटील, मनोहर जोशी यांच्यानंतर सुमित्रा महाजन यांच्या रूपाने पुन्हा एकदा मराठी माणसाला हा सन्मान मिळाला आहे.
थंबिदुराई उपसभापती?
अण्णा द्रमुकचे सदस्य एम. थंबिदुराई यांच्या नावाचा लोकसभेच्या उपसभापती पदासाठी विचार होऊ शकतो. जयललिता यांनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेतली, त्या वेळी या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. १९८५ ते १९८९ या काळात थंबिदुराई लोकसभेचे उपसभापती होते.