रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना उमेदवारी दिल्याने बॅरिस्टर ए. आर. अंतुले नाराज झाले आहेत. अंतुले यांनी तटकरेच्या कार्यप्रणालीवर तोफ डागतानाच काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवरही जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मोदी आणि राहुल गांधी एकाच माळेचे मणी असल्याचा आरोप अंतुले यांनी केला. पक्षात ज्येष्ठ नेत्यांना सन्मानजनक वागणूक दिली जात नाही, असा खळबळजनक आरोपही अंतुले यांनी केला होता. याबाबत काँग्रेस कमिटीने पक्षश्रेष्ठींकडे अंतुलेंच्या वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र माझ्यावर कारवाई करून दाखवाच, असे आव्हान अंतुले यांनी दिले होते.
रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील शेकाप उमेदवारांना आशीर्वाद दिल्यामुळे सुरू झालेले अंतुलेंचे नाराजी नाटय़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीमुळे संपुष्टात येईल अशी अपेक्षा वर्तवली जात होती. २ एप्रिलला सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला अंतुले हजेरी लावतील अशी अपेक्षा होती. मात्र या प्रचारसभेला बॅरिस्टर ए. आर. अंतुले आलेच नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसची बाजू सावरून घेण्याची वेळ आली. अंतुलेसाहेबांचे काही गैरसमज झाले होते, मी त्यांची भेट घेतल्यानंतर ते दूर झाले आहेत. त्यांचे आशीर्वाद आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मात्र आघाडीची सभा सुरू असतानाच शेकाप उमेदवार रमेश कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत अंतुले यांनी फोनवरून उपस्थितांशी संवाद साधत आपला शेकापच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अंतुलेंचे नाराजी नाटय़ संपले नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली.
बॅरिस्टर अंतुले यांच्या भूमिकेला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. माणिक जगताप, रवीशेठ पाटील आणि मधुकर ठाकूर यांनीही आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे बॅरिस्टर अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी या प्रकरणात त्यांची साथ दिलेली नाही. तटकरे यांच्या प्रचाराची जी जबाबदारी आपल्यावर येईल ती स्वीकारण्यास तयार असल्याचे मुश्ताक अंतुले यांनी जाहीर केले आहे. मात्र बॅरिस्टर अंतुले यांची भूमिका अजूनही स्पष्ट होत नसल्याने रायगडात उलटसुलट चर्चाना मात्र सुरू झाल्या आहेत हे मात्र नक्की..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा