सोलापूर मतदारसंघात यंदा काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना त्यांच्या अनुक्रमे आघाडी आणि महायुतीतील विस्कळितपणालाच मोठे तोंड द्यावे लागत आहे. काँग्रेसचे नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व भाजपचे अॅड. शरद बनसोडे यांच्यात इथे दुसऱ्यांदा लढत होत आहे. पण शिंदेंच्या विजयाची सारी मदार राष्ट्रवादीच्या सहकार्यावर तर बनसोडेंची पक्षांतर्गत समेटावर अवलंबून आहे.
सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ व मंगळवेढा-पंढरपूर याप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघांचा या मतदारसंघात समावेश आहे. यापैकी दोन जागा भाजपकडे तर दोन काँग्रेसकडे आहेत. मोहोळवर राष्ट्रवादी तर मंगळवेढा-पंढरपूर येथे अपक्ष आमदार भारत भालके यांचे वर्चस्व आहे. १६ लाख ६४ हजार ७७५ मतदारसंख्येच्या सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे हे यापूर्वी तीन वेळा निवडून गेले आहेत. आता ते चौथ्यांदा ही जागा लढवित आहेत. काँग्रेसची ताकद असलेल्या भागात शिंदे यांना सध्या गटबाजीला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे त्यांची सारी मदार राष्ट्रवादीच्या खऱ्याखुऱ्या पाठिंब्यावर आहे. यातच या मित्रपक्षाच्या पाठिंब्याविषयी सर्वत्र साशंकताच व्यक्त केली जात आहे. यामुळे शिंदे यांनी गेले काही दिवस सतत पवारांचा स्तुतीपाठ चालविला आहे.
भाजपने शिंदे यांच्याविरुद्ध अॅड. शरद बनसोडे यांना पुन्हा उतरविले आहे. बनसोडे हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सावरकर विचारमंचच्या माध्यमातून त्यांचा सोलापूरशी संपर्क आला आहे. ते यंदा निवडणूक लढविणार नव्हते, पण भाजपश्रेष्ठींनी आग्रह केल्याने ते रणांगणात उतरले आहेत. बनसोडेंच्या प्रचारातही महायुती अद्याप खऱ्या अर्थाने उतरलेली दिसत नाही.
सुशीलकुमार शिंदेंना यापूर्वी अनेकदा संधी देऊनही सोलापूरचे कायम राहिलेले मागासलेपण, नरेंद्र मोदी यांची हवा, प्रस्थापितांविरुद्ध असलेले बदलांचे वारे या साऱ्यातून सोलापुरात यंदा धक्कादायक निकाल लागू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा