लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या विधानाशी असहमत असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रामध्ये पुन्हा एकदा संयुक्त पुरोगामी आघाडीच (यूपीए-३) सत्तेवर येईल, असा आशावाद व्यक्त केला. आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नसून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करणे हाच आमचा एककलमी कार्यक्रम असल्याचे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२००९ मध्ये काँग्रेसला अधिक जागांवर विजय मिळाला हे दाखले देत शिंदे म्हणाले, ‘निवडणुकीच्या निकालासंदर्भात प्रत्येकाचा अंदाज असतो. जसा पवारांचा अंदाज आहे तसा माझाही अंदाज आहे. त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे विधान पवार यांनी केले असले तरी तसे घडेल असे आपल्याला वाटत नाही. कदाचित भाजपला गाफील ठेवण्यासाठी ते म्हणाले असावेत, अशी शक्यता  शिंदे यांनी वर्तवली.
‘तोपर्यंत दोषी कसे मानणार?’
राष्ट्रकुल युवा स्पर्धेतील गैरव्यवहारांचा ठपका असून तुरुंगामध्ये जावे लागल्यानेच सुरेश कलमाडी यांना उमेदवारी नाकारली का, या प्रश्नाविषयी सुशीलकुमार शिंदे म्हणाले, राजकारणात काही वेळा आरोप-प्रत्यारोप होत असतात. न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. यामध्ये पूर्ण निर्णय होत नाही तोपर्यंत कलमाडी दोषी आहेत असे कसे मानणार?

Story img Loader