काँग्रेसचे पानिपत करून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षात सत्तास्थापनेची लगबग सुरू झाली आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी येत्या २१ तारखेला होण्याची शक्यता आहे. मोदींसमवेत किमान दहा जण केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतील. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारी संख्या गाठल्याने मंत्रिमंडळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सहकारी पक्षांना कितपत स्थान द्यावे, याविषयी भाजपमध्ये खलबते सुरू झाली आहेत.
नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीत मंत्रिपदासाठी संभाव्य नावांवर चर्चा होईल. एकहाती निर्णय घेण्याची व तो राबवण्याची कार्यशैली असल्याने नरेंद्र मोदी स्वत:पेक्षा कमी क्षमता असलेल्यांना मंत्रिमंडळात प्राधान्य देण्याची चिन्हे आहेत. मात्र, पंतप्रधानपदाखालोखाल असलेल्या गृह विभागाची धुरा राजनाथ सिंह वा अमित शाह यांच्याकडे दिली जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या दहा वर्षांच्या काळात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये हिंदुत्ववादी संघटना विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक इंद्रेशकुमार यांना गोवण्यात आल्याचा आरोप भाजप नेते सातत्याने करीत आहेत. समझौता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी इंद्रेशकुमार यांची तासन्तास चौकशी करण्यात आली होती. इंद्रेशकुमारच नव्हे तर भाजप हितचिंतकांविरुद्ध सुरू असलेली अनेक प्रकरणे ‘निकाली’ काढण्यासाठी गृह विभागाची जबाबदारी वजनदार नेत्याला देण्याचा आग्रह संघ परिवाराने धरला आहे. मात्र, हे पद स्वत:कडेच ठेवण्याची मोदींची इच्छा आहे. भाजपच्या सत्तासंचालनात राजनाथ सिंह, अरुण जेटली व नितीन गडकरी यांचा मोठा सहभाग राहणार आहे. त्यांपैकी अरुण जेटली पराभूत झाल्याने त्यांच्याकडे कोणते खाते द्यावे, यावर भाजपमध्ये खल सुरू आहे. नाराज लालकृष्ण अडवाणी यांना रालोआचे निमंत्रकपद हवे आहे, तर सुषमा स्वराज यांना परराष्ट्र व्यवहार अथवा गृह खाते हवे आहे.  ‘पोलिओ डोस अभियानासारखी अभिनव संकल्पना राबवणारे डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली जाईल. वीस जणांचे छोटेखानी मंत्रिमंडळ बनवून मोदींना सत्ताकेंद्र स्वत:च्याच हातात ठेवायचे आहे. काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुल गांधी यांचे थेट प्रतिस्पर्धी वरुण गांधी यांनाही राज्यमंत्रिपद दिले जाईल. रालोआ सरकारमध्ये शिवसेनेचे आनंद अडसूळ, सुरेश प्रभू, अनंत गीते मंत्री होते. शिवसेनेकडून कुणाला मंत्री करावे यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.    
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींचे नाव वगळता अन्य एकही मंत्र्याच्या कामाची प्रसारमाध्यमांमध्ये कधीही चर्चा झाली नाही. कारण सरकार म्हणजे केवळ मोदी, हे गुजरातमधील समीकरण आहे. हे समीकरण कायम राहण्यासाठी मोदी ‘लो प्रोफाईल’ नेत्यांचा मत्रिमंडळात समावेश करतील. मोदींचे उजवे हात मानले जाणारे पुरुषोत्तम रूपाला, मीनाक्षी लेखी, शहनवाज हुसैन या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.