पालकमंत्री गणेश नाईक यांना आव्हान देत ठाणे लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकविण्याची बाता मारणाऱ्या शिवसेनेत प्रत्यक्षात सुरू असलेल्या सावळागोंधळाच्या नव्या कहाण्या दररोज बाहेर पडू लागल्या आहेत. मतदानाचा दिवस तोंडावर आला तरीही कार्यकर्त्यांपर्यंत प्रचाराचे साहित्य पोहोचत नसल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा संपर्क नेते एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालत उमेदवाराच्या नावाने ठणाणा केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. विरोधी पक्षातील उमेदवाराच्या कार्यालयावर निवडणुकीसाठी लागणारी रसद नियमितपणे पोहोचत असताना साधे बॅनर, पोस्टर पदरात पाडून घेताना आम्हाला घाम फुटत असल्याच्या तक्रारीही या वेळी मांडण्यात आल्या. हीच परिस्थिती राहिल्यास ठाण्यावर भगवा फडकविण्याचे स्वप्न विसरा, असा सूरही काही कार्यकर्त्यांनी मांडल्याचे बोलले जाते.
पोषक वातावरण असूनही ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर सावळागोंधळ असल्याची चर्चा आहे. कल्याण मतदारसंघातील निवडणूक चुरशीची बनल्याने एकनाथ शिंदे यांचा अर्धाअधिक वेळ तेथेच खर्ची पडू लागल्याने ठाण्यात शिवसेनेच्या गडावर शुकशुकाट पसरला आहे. गणेश नाईकांचा बालेकिल्ला असणाऱ्या नवी मुंबईत शिवसेनेचे कार्यकर्ते जोमाने काम करत असताना ठाण्यात प्रचाराची धुरा कुणी संभाळायची यावरून पदाधिकारी एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. विरोधी पक्षांकडून नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपर्यंत योग्य ती रसद वेळेवर पोहोचत असताना शिवसेनेच्या शाखांवर जुन्या वडापावच्या दिवसांची आठवण यावी, असे एकंदर चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री ठाण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेताच त्यापैकी काहींनी तक्रारींचा पाढाच त्यांच्यापुढे वाचल्याने संपर्कप्रमुखही अवाक् झाल्याचे बोलले जाते.
बैठकीच्या सुरुवातीला शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देत काहीसा दमबाजीचा सूर लावला. शिंदे यांच्या दराऱ्यामुळे काही वेळ उपस्थित पदाधिकारीही माना खाली घालून राहिले. मात्र, त्यापैकी काहींना ही दमबाजी असह्य़ झाल्याने राजन विचारे यांच्याविरोधातील तक्रारींचा पाढा शिंदे यांच्यापुढे वाचल्याचे सांगण्यात येते. वडापाव खाऊन प्रचार करायलाही आमची हरकत नाही, परंतु प्रचारासाठी लागणारे साधे साहित्य आमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत नसेल तर प्रचार तरी कुणाचा करायचा, असा सवाल या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी केला. उमेदवाराच्या सभा, दौऱ्यांची माहिती वेळेवर पोहोचत नाही, रॅलीचा मार्ग शेवटपर्यंत समजत नाही. विरोधी पक्षाकडून ब्लॉक अध्यक्षापर्यंत रसद पोहोचू लागली आहे. असे असताना साधे पत्रक पदरात पाडून घेताना आम्हाला गयावया करावी लागत आहे, अशा तक्रारीही शिंदे यांच्यापुढे मांडण्यात आल्याचे वृत्त आहे. या तक्रारी दूर करू असे आश्वासन देत शिंदे यांनी या वेळी वेळ मारून नेली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा