इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या प्रश्नावर आंदोलन करून राज्यभर आंबेडकरी तरुणांना संघटित करणाऱ्या आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेने लोकसभा निवडणुकीत ४७ मतदारसंघांत नकारात्मक मतदान करण्याचा (नोटा) निर्णय घेतला आहे. दलित मतदारांवर भिस्त असणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी रिपब्लिकनन सेनेची ही भूमिका त्रासदायक ठरणार आहे.
इंदू मिलच्या यशस्वी आंदोलनानंतर राज्यभरातील आंबेडकरी समाजातील तरुण कार्यकर्ता रिपब्लिकन सेनेशी जोडण्याचा आनंदराज यांचा गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न आहे. मात्र सध्या तरी त्यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. आनंदराज यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आंबेडकर भवनमध्ये संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात कोणत्याही पक्षाच्या मागे फरपटत जायचे नाही. मात्र आपला मतदानाचा हक्क बजावयाचा, असे ठरले.
 राज्यातील ४७ मतदारसंघात रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व समर्थक नकारात्मक मतदान करतील, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळजे यांनी दिली. अर्थात अकोला मतदारसंघात भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यात आला आहे. रिपब्लिकन सेनेची खास अशी मतपेढी नाही. तरीही चहूबाजूंनी काँग्रेसचा त्रास या भूमिकेमुळे वाढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा