नरेंद्र मोदी यांचा प्रचंड प्रभाव, काँग्रेसविरोधातील नाराजी, रिपब्लिकन पक्षातील गटबाजी याच्या एकत्रित परिणामी महाराष्ट्रात कधी नव्हे इतकी आंबेडकरवादी पक्ष आणि तिसऱ्या पर्यायाची भाषा करणारे सपा, डावे पक्ष, आप आदींची आक्षरश: धूळधाण झाली. महायुतीने अभूतपूर्व यश मिळविले असले तरी, त्यांच्यासोबत असणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे कुठेच अस्तित्व दिसले नाही. साताऱ्यातील त्यांच्या एकमेव उमेदवाराला दारुण पराभव पत्करावा लागला. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्वही निष्प्रभ ठरले, तर बसपनेही हरण्याची परंपरा कायम राखली आहे.
मोदींच्या त्सुनामीत काँग्रेसचीच पार वाताहत झाली. त्यात आधीच गटबाजीने पोखरलेल्या आणि कुणाच्या तरी आधारनेच राजकारण करणाऱ्या आंबेडकरवादी पक्षांचे नामोनिशाणही राहिले नाही. राज्यात महायुतीला प्रचंड यश मिळाले. परंतु त्यात आठवले यांच्या गटाचा किती फायदा झाला हे सांगणे कठीण आहे. मात्र एकमेव सातारा मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अशोक गायकवाड चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. मुंबईत आठवले यांच्या गटाचा प्रभाव आहे. त्यांच्या समर्थकांची मते महायुतीकडे वळली असणार. परंतु दलित समाजात काँग्रेसच्या विरोधात मोठी नाराजी होती. त्याचाही फायदा महायुतीला मिळाला. त्यामुळे आठवले यांच्या पक्षाचे अस्तित्व जाणवलेच नाही. स्वाभाविकच आठवले यांचा हा पराभवच मानला जात आहे.
पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या मायावती यांच्या बसपचा त्यांच्या राज्यातच पाया उउखडला गेला. त्याची महाराष्ट्रातील गत आणखीच केविलवाणी झाली. सर्व ४८ जागा लढविणाऱ्या बसपने या वेळीही हरण्याची पंरपरा कायम राखली आहे. बाहेरच्या उमेदवारांना उभे करणाऱ्या बसपला दलित समाजाने अजून स्वीकारलेले नाही, हे त्यातून स्पष्ट दिसते. पाच वर्षे भूमिगत राहून पक्षबांधणी केल्याचा बसपाचा दावा फोलच ठरला.
आपची कमाईही तुटपुंजीच
राजकीय परिवर्तनाचे ढोल ताशे बडवत आलेल्या आम आदमी पक्षाने राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढविल्या. त्यांना सर्वत्र पराभवाचाच तडाखा बसला. मात्र या पक्षाला १०-१५ मतदारसंघांत किंचित लक्षणीय मते मिळाली. मेधा पाटकर, वामनराव चटप, मयांक गांधी, संजीव साने, सतीश जैन, मीरा सन्याल, सुरेश खोपडे, अंजली दमानिया, सुभाष वारे ही नावे सामाजिक-राजकीय चळवळीशी जोडली गेली आहेत. त्यांच्या वैयक्तिक प्रभावामुळे त्यांना बऱ्यापैकी मते घेता आली.
काही मतदारसंघांत ३० हजार ते दीड लाखापर्यंत मते नोंदली गेली, हीच आम आदमीची काय ती कमाई म्हणावी लागेल.
फक्त पराभव आणि पराभवच!
प्रकाश आंबेडकर यांनी भारिप-बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली छोटय़ाछोटय़ा पक्ष-संघटनांची ‘महाराष्ट्र लोकशाही आघाडी’ स्थापन केली होती. २०-२२ जागांवर त्यांचे उमेदवार उभे होते. आंबेडकर स्वत: अकोल्यातून लढले. त्यात त्यांचा पराभव झाला. इतर उमेदवार तर खिजगणतीतही नव्हते. आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारिप पूर्णपणे निष्प्रभ ठरला. राज्याच्या राजकारणात दुसरा रिपब्लिकन गट म्हणजे रा.सू.गवई यांचा गट. त्यांच्या गटाचे राजेंद्र गवई यांचाही अमरावतीत दारुण पराभव झाला. बाकीचे चिल्लर रिपब्लिकन गट कुठे वाहून गेले कुणला कळलेही नाही. महायुतीत सहभागी झालेल्या आणि मंत्रिपद मिळेपर्यंत शपथ न घेण्याचा दावा करणाऱ्या रिपब्लिक पक्षाला या ‘महायुती’चा फारसा फयदा होऊ शकला नाही.
बसपसारखीच सपाचीही राज्यात फजिती झाली. केवळ राजकीय उपद्रव वाढविण्यासाठी निवडणुका लढविणाऱ्या सपाचा पार सफाया झाला. मुंबईत उत्तर-मध्य मतदारसंघात सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी पुत्र फरहान आझमी यांना दहा हजारांच्या आतच गाशा गुंडाळावा लागला. या पक्षाचे मुंबईतील अस्तित्व संपुष्टात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी पक्षाला मिळालेल्या जागांची संख्या घसरली असली तरी आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. आगामी काळात येऊ घातलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता, राष्ट्रवादी अध्यक्ष आणि मुरब्बी राजकारणी असलेल्या शरद पवारांना आपला सर्व अनुभव पणास लावावा लागणार आहे. पक्षांतर्गत कलहांना पूर्णविराम देणे हे पवारांसमोरील आव्हान आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा