तिसरी आघाडी थकलेली आघाडी असून, ती कालबाह्य़ झाली आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. काँग्रेस आणि भाजवरही टीकास्त्र सोडताना पंतप्रधानपदाची आपली महत्त्वाकांक्षा लपवून ठेवलेली नाही.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ममतांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ६० ते ७० तर भाजपला १५० ते १६० जागा मिळतील, असे भाकीत ममतांनी वर्तवले. साम्यवाद्यांना जनतेने नाकारले आहे. त्यामुळे जे त्यांच्याबरोबर जातील त्यांची ताकद नगण्यच राहणार, असे विश्लेषण ममतांनी केले. निकाल जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सहकार्याने एक आघाडी स्थापन होईल. प्रादेशिक पक्षांची आघाडी सत्तेत येईल, असा दावा केला. समान धोरणांवर आधारित ही आघाडी असेल. सध्या प्रसिद्धीच्या झोतात राहणे ही काही जणांची हौस आहे. त्यापेक्षा जास्तीस्त जास्त खासदार दिल्लीत नेऊन स्थान भक्कम करणे हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे काय, यावर थेट उत्तर देण्याचे ममतांनी टाळले. मात्र केंद्रात आणि राज्यात काम करण्याचा अनुभव असल्याचे सांगत तसे संकेतही दिले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे, तर दंगलीला प्रोत्साहन देणाऱ्या पक्षांवर जनतेचा रोष आहे, असे सांगत त्यांनी भाजपवरही तोफ डागली. बंगालच्या विकासाला केंद्रबिंदू मानून काम केल्याने जनता आम्हाला साथ देईल, असा विश्वास ममतांनी व्यक्त केला.