‘राणे विरुद्ध सारे’ मुळे संवेदनशील बनलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या काळात हमखास दिसणाऱ्या चाकरमानींवर पोलिसांची सध्या करडी नजर आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत यंदा अजून तरी ही वर्दळ फारशी जाणवू लागलेली नाही.
निवडणुकीत आपल्या उमेदवाराला अनुकूल मतदान करून घेण्यासाठी विविध प्रकारचे ‘प्रयोग’ करण्यात हा मतदारसंघ आघाडीवर मानला जातो. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वेंगुर्ले नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी बाहेरगावाहून आलेल्या चाकरमानींनी रात्रीच्या वेळी रस्त्यावर असलेल्या वाहनांची मोठय़ा प्रमाणात नासधूस केली होती. ती निवडणूक काँग्रेस पक्षाला गमवावी लागली. त्यापूर्वी मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्’ाात अंकुश राणे नावाच्या व्यक्तीचा खून झाला होता. त्या गुन्ह्य़ाचा तपास अद्याप लागलेला नाही. विशिष्ट मतदान केंद्रांच्या परिसरात विरोधी उमेदवाराचे बूथ लावू न देणे, विरोधी मतदान करण्याची शक्यता असलेले ग्रामस्थ मतदानासाठी बाहेर पडू शकणार नाहीत, याची काळजी घेणे असेही प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. हा पूर्वेतिहास लक्षात घेऊन संपूर्ण मतदारसंघात यंदा निवडणूक प्रचार काळापासून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या वाहनांची नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे. मतदानाच्या दिवशी दोन्ही जिल्ह्यांमध्ये पोलिस बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये मिळून वरिष्ठ अधिकारी वगळता एकूण सुमारे पाच हजार पोलीस व होमगार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. एसआरपी व रेल्वे पोलिसांची प्रत्येकी एक कंपनी नियुक्त करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा