बहुमतापेक्षाही जास्त जागा जिंकून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाला अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसपेक्षा तृणमूल काँग्रेसच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. सलग दुसऱ्या दिवशी तृणमूलच्या सदस्यांनी रेल्वे अर्थसंकल्पाविरोधात लोकसभेत निदर्शने केली. तृणमूलच्या कल्याण बॅनर्जी यांनी तर थेट लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यावरच शरसंधान केले. मात्र कठोर कारवाईचे अस्त्र उपसल्यावर कल्याण बॅनर्जी यांनी सुमित्रा महाजन यांची क्षमा मागितली.
रेल्वे अर्थसंकल्पात पश्चिम बंगालचा वाटा कुठे आहे? मंहगाई हटावो – देश बचावो, संसदेवर भाजपची गुंडागर्दी चालणार नाही, ममता बॅनर्जी जिंदाबाद. अशा घोषणा तृणमूल सदस्यांनी दिल्या. त्यांच्या हातात सरकारविरोधी फलक होते. त्यावर महाजन म्हणाल्या की, अशा रीतीने सभागृहाच्या कामकाजात बाधा आणू नका. रेल्वे अर्थसंकल्पवरील चर्चेत तुमचे म्हणणे मांडा, अशी सूचना महाजन यांनी केली. मला कठोर कारवाई करण्यास बाध्य करू नका, अशी आर्जव महाजन करीत होत्या. त्यानंतरही तृणमूल सदस्यांचा गोंधळ सुरू होता. महाजन यांच्या आसनासमोर येऊन बॅनर्जी यांनी घोषणाबाजी केली. तुम्ही केवळ भाजप वा मोदींच्या लोकसभा अध्यक्षा नाही, अशा शब्दात बॅनर्जी यांनी रोष व्यक्त केला. त्यावर संतप्त सत्ताधाऱ्यांनी कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. वाढलेल्या गोंधळामुळे महाजन यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर कल्याण बॅनर्जी यांनी महाजन यांची माफी मागितली.
वाढत्या महागाईवरून विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकरावर टीकेची झोड उठवली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर यांनी भाषणाच्या सुरवातीलाच ‘अच्छे दिन कुठे आहेत?’ असा टोमणा मारला. खाद्यान्नाच्या किमती आटोक्यात असल्याच्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्याचा अमरिंदर यांनी निषेध केला. ते म्हणाले की, कांदा, बटाटय़ाचे भाव गगनाला भिडत आहेत. साठेबाज व दलालांमुळे शेतकरी तोटा सहन करीत आहेत. वस्तूंच्या किमतीत तब्बल अडीचशे टक्के भाववाढ झाली आहे. या किमती नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काय करीत आहात? दलालांची बजबजपुरी माजली आहे. दलालांना चाप लावण्यासाठी कोणत्या कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत, असा सवाल अमरिंदर सिंह यांनी विचारला. भाजप सदस्य अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या धोरणामुळे महागाई वाढली. त्यात सर्वाधिक दोष काँग्रेसचा आहे.

Story img Loader